नाशिक : राजस सुकुमारा मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया....असे ज्याचे सार्थ वर्णन केले जाते अशा विठुरायासाठी यंदा आषाढी एकादशीचे दिवशी होणाऱ्या महापूजेसाठी नाशिकहून तुषार भोसले यांनी तयार करवून घेतलेल्या महावस्त्रांचा साज चढवला जाणार आहे. शुक्रवारी (दि. ४) ही वस्त्रे पंढरपूरकडे रवाना होत आहे.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत विठ्ठल-रखुमाईची आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात (दि. ६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होणार आहे. पूजेसाठी मुख्यमंत्री स्वत: महावस्त्र विठ्ठलचरणी अर्पण करतात. पूजेसाठी लागणारी खास महावस्त्र यंदा नाशिकहून पंढरपुरी जाणार आहेत. भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी ही महावस्त्र तयार करून घेतली आहेत. विठ्ठल रखुमाईचे पूजेसाठी जांभळा किंवा भगवा रंगाची महावस्त्रे तयार करावी, अशी इच्छा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार तुषार भोसले यांनी विठुरायासाठी तलम भरजरी रेशमी जांभळे महावस्त्र करून घेतली आहेत. जांभळ्या रंगातील रेशमी महावस्त्रावर कलात्मक एम्ब्रॉयडरीचे जरीकाम करण्यात आले आहे. पांडुरंगासाठी बाराबंडी (अंगरखा), भरजरी भगव्या रंगाचे सोवळे व त्यावर जांभळा-सोनेरी रंगाची कलात्मक काठाची झालर व विठुरायाला खांद्यावरून घेण्यासाठी शेला तयार करण्यात आला आहे.
जगतजननी रखुमाई मातेसाठीही नाचणाऱ्या मोराचा पदर असलेली जरतारी जांभळ्या रंगाची नऊवारी पैठणी आणि भगव्या रंगाचा सुरेख शेला तयार करण्यात आला आहे. ही वस्त्रे लवकरच पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे, अशी माहिती तुषार भोसले यांनी दिली.
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊ दे, आषाढी एकादशीला विठुरायाला महावस्त्राचा साज चढवेल', असे साकडे विठुरायाला घातले. ते सफळ झाले. त्यानुसार वस्त्र नाशिकहून पाठवण्यासंबंधी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. त्यांनीही होकार दिला. त्यानुसार रेशमी महावस्त्र पंढरपूरला रवाना करत आहोत.तुषार भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख, नाशिक