विंचूर : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील विंचूर शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढते नागरीकरण आणि औद्योगिक विकास यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर कोणतेही प्रभावी नियंत्रण नसल्याने पादचारी, दुचाकीस्वार तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने धोकादायक ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी जोरदार मागणी विंचूर ग्रामस्थांकडून होत आहे. महामार्गावरून अवजड वाहने, खासगी वाहने, दुचाकी व चारचाकी तसेच प्रवासी वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र महामार्गावरून जाणारी अनेक वाहने भरधाव असल्याने रस्ता ओलांडताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
विशेषतः महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनांचा वेग कमी होत नसल्याने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
विंचूरमधील कांदा मार्केट परिसर, एमआयडीसी सर्कल, पुलाजवळील परिसर तसेच इरिगेशन कॉलनीजवळील रस्ता ही ठिकाणे नागरिकांच्या दृष्टीने अधिक धोकादायक ठरत आहेत. या ठिकाणी दिवसभर नागरिकांची ये-जा सुरू असते. कांदा मार्केटमध्ये शेतकरी, व्यापारी, हमाल आणि वाहनचालकांची मोठी गर्दी असते, तर एमआयडीसी परिसरात कामगारांची ये-जा सुरू असल्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अशा गर्दीच्या ठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. पुलाजवळ आणि इरिगेशन कॉलनी परिसरात रस्ता ओलांडताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरात वाहतुकीचे सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी नियमानुसार गतिरोधक, गतिरोधक आणि वेगमर्यादा दर्शविणारे फलक, रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित व्यवस्था तसेच रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसणारे रस्ते चिन्हे असलेले फलक बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता बांधकाम विभागाने तातडीने योग्य ठिकाणी गतिरोधक बसवावेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.- सचिन दरेकर, माजी सरपंच, विंचूर.
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांचा वेग प्रचंड असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. विशेषतः विद्यार्थी आणि वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.- किशोर जेऊघाले, रा. काँ. शहराध्यक्ष, विंचूर.