Vinayak Raut Chiplun Visit 
नाशिक

Vinayak Raut | महाराष्ट्राचे 'एपस्टिन' प्रकरण! अशोक खरातचे तोंड उघडले तर अर्धे मंत्रिमंडळ घरी जाईल; विनायक राऊतांचा घणाघात

Vinayak Raut | माजी खा. विनायक राऊत यांचा खळबळजनक दावा

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण शहर : पुढारी वृत्तसेवा

खरात प्रकरणी पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीमधून वेगवेगळ्या नेत्यांची भांडाफोड झाल्यास संबंधित नेत्यांकडून खरातला संपविला जाण्याची भीती असल्याचा खळबळजनक दावा उबाठा शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना केला असून राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात यांच्या जिवाचे रक्षण करण्याचे कर्तव्य करावे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

माजी खा. राऊत हे चिपळूण दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, खा. राऊत यांनी चिपळूण दौऱ्यामध्ये संघटनात्मक बांधणी व पदाधिकाऱ्यांशी बैठकीच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन नागरिकांच्या प्रश्नासाठी लढण्याची सूचना केली.

कार्यकर्त्यांनी केवळ राजकीय उपस्थिती न ठेवता जनतेच्या अडीअडचणींमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले. दरम्यान, माजी खा. राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, कॅ. अशोक खरात संदर्भात मत व्यक्त करताना सांगितले की, खरात याच्या जाळ्यात सापडून सेवा करणाऱ्या रूपाली चाकणकर यांच्या पदाचा राजीनामा घेऊन दिशाभूल करण्याचा प्रकार होऊ शकतो. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत खरात याचा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलिस जेव्हा खरातकडून वेगवेगळ्या नेत्यांचा भांडाफोड करतील तेव्हा या नेत्यांकडून खरातला संपविले जाईल, अशी भीती आहे. खरात प्रकरण म्हणजे महाराष्ट्रातील एपस्टिन प्रकरण आहे. अधिक सखोल चौकशीतून राजकारण्यांची नावे उघड होणे गरजेचे आहे.

ज्या दिवशी सखोल चौकशीत पोलिसांकडून खरातचे तोंड उघडेल त्या वेळेस राज्यातील मंत्रिमंडळातील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांचे खरे स्वरूप राज्य व देशाच्या जनतेसमोर उघड होईल. अशा या कलंकीत भ्रष्टाचारी मंत्र्यांना खरात प्रकरणातील व्हिडीओतून वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव येण्याची शक्यता आहे.

त्याचे व्हिडीओ पूर्णपणे जनतेसमोर उघड करा व यात सहभागी असणाऱ्यांची हकालपट्टी करा. राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा मंजूर आहे. असे असताना देखील अनेक मंत्री संवैधानिक पद सांभाळणारे नेते शिष्य बनून खरात याचे पाय धुत होते. अशा या खरातच्या जाळ्यात जे-जे मंत्री सेवेत होते त्या सर्वांची हकालपट्टी होणे गरजेचे आहे.

शिवसेनेचे दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी होणे गरजेचे आहे. केसरकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना खरातचा रस्ता दाखविला तर खरात यानेच संबंधित नेत्यांना गुवाहाटीचा रस्ता दाखविला, असा आरोपही राऊत यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. यावेळी नगरसेवक अजय भालेकर व वैशाली कदम यांचे माजी खा. राऊत यांनी अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT