नाशिक : शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांची रविवारी (दि. २९) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात थाटात प्रवेश झाला आहे. यावेळी विलास शिंदे यांना पक्ष प्रवेशासाठी एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेचे छायाचित्र असलेले वाहन आणि 'खड्ग' सुद्धा पाठवण्यात आले होते. शिंदेच्या सोबतच आठ माजी नगरसेवकांसह पदाधिकारी यांनी प्रवेश केला आहे. माजी नगरसेवकांमध्ये पल्लवी पाटील, नितीन मोहीते, नयना गांगुर्डे, विष्णुपंत बेंडकुळे , योगेश शेवरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Maharashtra political movements)
बडगुजर यांच्यापाठोपाठ ठाकरे गटाला विलास शिंदे यांच्या रुपाने दुसरा मोठा धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाचे नाट्य रंगले. बडगुजर यांनी नाराजी उघडपणे मांडल्यानंतर त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई झाली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण पक्षात नाराज असल्याचे बडगुजर यांनी म्हटले होते. त्यांचे विधान खरे ठरले. मुलीच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने विलास शिंदे यांनी गेल्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळेस भेट घेतली होती. गुरुवारी (दि.२६) शिंदे यांनी स्वत:च्या वाढदिवस कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीचे कारण देत समर्थकांसह पक्षांतराचे संकेत दिले होते. त्यांनतर माध्यमांसमोर पक्षाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर शुक्रवारी (दि.२७) खासदार संजय राऊत यांनी शिंदेना महानगरप्रमुख पदावरून हटवत मामा राजवाडेंकडे महानगरप्रमुख सोपवले होते. या बदलानंतर शिंदे यांनी आता आपल्या समर्थकांसह रविवारी (दि.२९) सकाळी ११ वाजता शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.
विलास शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णुपंत बेंडकुळे, पल्लवी पाटील, उषा शेळके, निलेश ठाकरे, धीरज शेळके, निवृत्ती इंगोले आदी पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा प्रवेश सोहळा पार पडला.
शिवसेना ठाकरे गटात माझ्यावर वारंवार अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे मीच उबाठाला सोडचिठ्ठी दिली. रविवारी (दि.29) रोजी ठाण्यात शिवसेना शिंदे गटात समर्थकांसह प्रवेश घेतला आहे. ठाकरे गटात माझ्यावर अन्याय झाला आहे. आम्ही निष्ठावान आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेत जात आहोत. एकनाथ शिंदे यांच्या जवळ गेल्यावर जाणवते की, माणूस वेगळा आहे. अहोरात्र कार्य ते असतात, असा होणे नाही. माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाच्या घरातल्या लग्नाला शिंदेसाहेब आले होते, त्याचा मला आनंद असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली होती.विलास शिंदे, माजी महानगरप्रमुख उबाठा