नाशिकरोड : प्रफुल्ल पवार
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात पहिला उड्डाणपूल अशी ओळख असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, पुलावरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. उड्डाणपुलाखालील भाग बकाल झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाने हा पूल अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिक शहराचे प्रवेशद्वार म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल याची ओळख आहे. या पुलाचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सन 2000 साली झाले होते. या पुलामुळे पुणे-शिर्डी नगरकडे जाणारी वाहने उड्डाणपुलाचा वापर करतात. मात्र, सध्या या उड्डाणपुलावरील रस्त्याची चाळण झाल्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. पुलावर पावसाचे पाणी साचत असून, त्यातून मोठे वाहन गेल्यानंतर ते पुलाच्या बाजूला असलेल्या खालच्या रस्त्यांवर पडत असल्याने दुचाकीस्वारांची अक्षरशः अंघोळ होते.
उड्डाणपुलावरील पथदीप बंद आहेत. मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक वाहने या खड्ड्यांत रुतून बसतात. त्यामुळे दोन ते तीन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागतात. या पुलाबरोबरच सिन्नर फाट्याकडून नाशिकरोड शहरात येणारा जुन्या पुलाची अवस्था दयनीय झाली आहे. जुन्या पुलावर वाहनाचा वेग प्रतिबंधासाठी टाकलेल्या स्पीडब्रेकरमुळे अनेक अपघात झाले आहेत. चार ते पाच धारकांना आपला जीवही यामुळे गमवावा लागला आहे. तसेच पुलावरून खाली उतरल्यानंतर असलेले लोखंडी कठडे चोरट्यांनी काढून नेल्याने वाहनाचे नियंत्रण बिघडल्यास अनेक वाहने देवी चौकाच्या रोडवर किंवा नवले चाळीच्या भागात येऊन अन्य वाहनांना धडकतात.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळासमोरील उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली असून, तेथील पाणी नेहमीच रस्त्यावर वाहते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू असून, या कामाला अस्वस्छतेमुळे नजर लागण्याची शक्यता आहे.
कायद्याने उड्डाणपुलाखाली कोणत्याही प्रकारच्या बाजारास परवानगी नसतानाही या ठिकाणी भाजीपाला बाजार भरतो. हा बाजार स्थलांतरित करण्याबाबत अनेकदा मनपा प्रशासनाने प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आलेले नाही. त्याचबरोबर चौक जलधारा बिल्डिंग समोरील पुलाखालील भागात अनेक व्यावसायिकांनी अनधिकृतपणे आपले व्यवसाय सुरू केले आहे. रात्रीच्या सुमारास येथे वाहनांवर बसून मद्यपी मध्याचा आस्वाद घेताना दिसून येतात. तर बिटको चौकात या पुलाखाली बेकायदेशीर पार्किंग केले जाते. वीज नसल्याने हा भाग भिकारी आणि गर्दुल्ले यांचे आश्रयस्थान झालेले आहे. प्रशासनाने या पुलाची दुरुस्ती करुन त्याला नववैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
"या पुलाखाली दुर्गंधी व चिखल आहे. अनधिकृत व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास होऊ शकतो. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून या पुलाचे तातडीने सुशोभिकरण करावे. बाहेरगावच्या भाविकांना नाशिकमध्ये प्रवेश करतानाच चांगला अनुभव मिळेल याची दक्षता घ्यावी."राजेंद्र राजणे, मित्र मेळा संघटना संस्थापक अध्यक्ष
"वीर सावरकर उड्डाणपुलाची कुंभमेळ्याअगोदर तातडीने दुरुस्ती करावी. जुन्या पुलालाही दोन्ही बाजूंनी कठडे बसवून संभाव्य जिवीतहानी टाळावी. परराज्यातून येणाऱ्या भाविकांमुळे येथे प्रचंड गर्दी होते. प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करावी."विक्रम कोठुळे, नाशिकरोड उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार. गट)