नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमा सणाचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण असून शहरात विविध ठिकाणी सकाळपासूनच वडाचे पूजन करण्यासाठी महिलांची लगबग दिसून येते. त्याचबरोबर महिलांकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला जात आहे. तसेच एआयच्या युगात वटपौर्णिमेचे स्वरूप बदलत असून, सोशल मीडियावर इन्स्टाग्राम आणि फेसबुकसाठी आकर्षक रील्स व फोटोशूट करण्याचा ट्रेंड वाढत असल्याचे दिसत आहे.
एका मिनिटभराच्या रीलसाठी साधारणतः तीन हजार रुपये घेण्यात आले. वटपौर्णिमेचे बदलते स्वरूप सोशल मीडियावरही ठळकपणे दिसून येत आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकसाठी आकर्षक रील्स व फोटोशूट करण्याचा ट्रेंड वाढल्याने मेहेंदी कलाकार, मेकअप आर्टिस्ट, फोटोग्राफर, साडी ड्रेपिंग तज्ज्ञ आणि दागिने व्यावसायिक यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
एका मिनिटाच्या एका रीलसाठी साधारणतः तीन हजार रुपये घेतले जात आहेत. रील, मेहेंदी, मेकअप, सिनेमॅटिक शूट, साडी ड्रेपिंग, फोटोशूट असा संपूर्ण कोम्बो पॅकसाठी १० ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च होत असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. यंदा पारंपरिक पैठणी, नऊवारी साड्या, फुलांचे दागिने, पारंपरिक मेकअप आणि सिनेमॅटिक रील्स यांना विशेष पसंती मिळत आहे. तसेच हातांवर वडाचे झाड, कुयरी आणि पतीचे नाव असलेली पारंपरिक मेहंदीही महिलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
मेहंदीसाठी हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत खर्च होत असल्याचे कलाकारांनी सांगितले. पर्यावरणपूरक उपक्रमातून वटपौर्णिमेला झाडांचे संवर्धन करण्याचा संदेश दिला जात असून, सोशल मीडियामुळे या सणामध्ये आधुनिक ग्लॅमरस आल्याचे दिसत आहे. धार्मिक श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि डिजिटल युगातील बदलती जीवनशैली यांचा संगम वटपौर्णिमेला अनुभवायला मिळाला.
वडाच्या संगोपनाचा संकल्प
शहरातील काही संस्था आणि नर्सरींच्या पुढाकारातून महिलांना वडाची रोपे मोफत देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. गंगापूर रोडवरील शेकडो वर्षांपूर्वीची झाडे तोडल्याने वडाच्या झाडाचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. महिलांनी पूजेनंतर मिळालेले विनामूल्य वडाचे रोप लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे केवळ धार्मिक परंपरेचे जतनच नव्हे, तर पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळत आहे.