देवळा (नाशिक) : संपूर्ण कसमादेसह उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे वैभव असलेला वसाका (वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना) साखर कारखाना सध्या मृत्यूशय्येवर आहे. पूर्वी हजारो शेतकरी, कामगार आणि वाहतूकदारांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेला हा कारखाना गेली दोन वर्षे बंद असून, त्यात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत.
अलीकडेच वसाका कारखान्याच्या उत्तर बाजूला असलेल्या वातानुकूलित अतिथीगृहाच्या पाठीमागे असलेल्या 'शेतकरी निवास' येथील खोल्यांची कुलपे तोडून फर्निचर, गाद्या आणि इतर सामान चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (Vasantdada Patil Co-operative Sugar Factory)
सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वी कारखान्यातील विज प्रकल्पातील महाकाय ट्रान्सफॉर्मरमधून हजारो लिटर ऑईल चोरीला गेले होते. या प्रकरणात गुन्हेगार पसार झाले असून, पोलिसांना अजूनही त्यांचा मागमूस लागलेला नाही. त्यानंतर मुख्य कारखान्याच्या पश्चिमेकडील दगडी भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी प्रवेश केला होता. त्यावेळी लाखो रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक मोटारी, पितळी आणि लोखंडी व्हॉल्व ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून नेण्यात आल्या होत्या. ही सामग्री गिरणा नदीकिनारी सापडली होती.
सध्या कारखान्यात कोट्यवधींच्या मालमत्तेचे काय राहिले आहे, हे सांगणे कठीण आहे. एखाद्या काळात परिसरात दोन ते तीन बिबट्यांचा वावर असल्यामुळे चोर्या काही प्रमाणात आटोक्यात आल्या होत्या. मात्र, अलीकडे पुन्हा एकदा चोरीच्या घटना सुरू झाल्या आहेत. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते कुबेर जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत विशाल निकम, दिनेश ठाकरे, युनियन सदस्य शशिकांत पवार, दीपक पवार आणि रणधीर पगार हेही उपस्थित होते.
500 कोटींची मालमत्ता असलेल्या वसाकाची सुरक्षा वार्यावर सोडून प्रस्थापितांनी पळ काढला. 25 हजार सभासद, शेकडो कामगार बेरोजगार झाले. कारखान्याच्या चोहोबाजूने सद्या चोरांचा सुळसुळाट असून कारखान्याला कोणी वाली नाही. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक