Nashik CIDCO Ward Meeting  
नाशिक

Nashik CIDCO Ward Meeting | सिडको प्रभाग सभेत बडगुजर-शहाणेंमध्ये जुंपली

Nashik CIDCO Ward Meeting | पाणी प्रश्न, ड्रेनेज, दूषित पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

पुढारी वृत्तसेवा

सिडको : पुढारी वृत्तसेवा

तब्बल चार वर्षांनंतर झालेली सिडको प्रभाग समिती बैठकीत नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात शिवीगाळ झाल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अन्य नगरसेवकांनी केलेला हस्तक्षेप आणि नंतर दोघांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीमुळे वादावर पडदा पडला. समेत पाणी प्रश्न, ड्रेनेज समस्या तसेच दूषित पाणीपुरवठा या मुद्द्यांवरून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

मनपा सिडको विभागीय कार्यालय सभागृहामध्ये प्रभाग सभापती बाळकृष्ण शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत नगरसेवक सुधाकर बडगुजर, प्रवीण तिदमे, मुकेश शहाणे, नितीन दातीर, मुरलीधर भामरे, शरद फडोळ, भूषण राणे, भगवान दोंदे, डॉ. योगिता हिरे, प्रतिभा पवार, सुवर्णा मटाले, पल्लवी गणोरे, डॉ. पूनम महाले, छाया देवांग, कविता नाईक, साधना मटाले, प्रियंका दोंदे, किरण दराडे, वैशाली दळवी, माधुरी डेमसे यांच्यासह विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, उपअभियंता हेमंत पठे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, उद्यान निरीक्षक प्रशांत परव आदी उपस्थित होते.

नगरसेविका कविता नाईक यांनी प्रभाग २५ मध्ये नळाला येत असलेल्या दूषित पाण्याचे नमुने सभागृहात सादर केले नगरसेविका साधना मटाले यांनी दूषित पाण्याची बाटली प्रभाग सभापती शिरसाठ यांना दिली. यावेळी प्रभाग सभापती शिरसाठ नवीन आहेत, त्यांना जागेवरून उठवू नका, असे म्हटल्यानंतर बडगुजर व शहाणे यांच्यामध्ये शाब्दिक वादानंतर एकमेकांना शिवीगाळ झाल्यानंतर सभागृहात खळबळ उडाली होती.

अन्य नगरसेवकांनी दोघांनाही शांत केल्यानंतर सभा सुरू झाली. त्यानंतर नगरसेवक मुकेश शहाणे यांनी घडलेल्या प्रकाराबाबत सभागृहाची दिलगिरी व्यक्त करून प्रभागातील पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी करून सभेतून निघून गेले. मुरलीधर भामरे यांनी त्रिमूर्तीचौक ते माउली लॉन्स रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे अपघात होत असून, खड्डे बुजविण्याची मागणी केली.

नगरसेविका पल्लवी गणोरे यांनी प्रभाग २४ मधील ड्रेनेज समस्या व पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. किरण दराडे यांनी संभाजी स्टेडियमवरील 'खेलो इंडिया' मधील अर्धवट झालेले काम पूर्ण करण्याचा मुद्दा मांडला. प्रतिभा पवार व सुवर्णा मटाले यांनी प्रभाग २८ मधील नाले स्वच्छता, माउली लॉन्स परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. प्रभागातील जलकुंभपाण्याने भरला जात नसल्याचा आरोप प्रतिभा पवार यांनी केला.

भगवान दोंदे व वैशाली दळवी यांनी प्रभाग ३१ मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली सुधाकर बडगुजर यांनी सिडको भागातील पाणीपुरवठा सुरळीत कसा केला जाऊ शकतो, याची माहिती दिली. तसेच ड्रेनेज समस्या कायमची सोडविण्यासाठी प्रत्येक प्रभागात पाच किमी ड्रेनेजलाइन टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्याची मागणी केली. तसेच अमृत योजनेमध्ये सिडकोचा समावेश करावा व प्रभाग सभेला अधिकार वाढवून द्यावा.

पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनीही सभेला उपस्थित राहिले पाहिजे, अशी मागणी तिदमे यांनी केली. प्रभाग २७ मधील काही भागांत सातपूर पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा केला जातो तर सातपूर येथील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सभेला उपस्थित राहिले पाहिजे, अशी मागणी नितीन दातीर यांनी केली.

महिलांचा पाण्यासाठी मोर्चा

प्रभाग क्रमांक २९ मधील लोकमान्यनगर, तुळजा भवानी चौक, पवननगर या भागांत चार दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नगरसेवक भूषण राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग सभेवर महिलांचा मोर्चा काढण्यात आला

दोघांच्या दिलगिरीने वादावर पडदा

प्रभाग सभेत सुधाकर बडगुजर व मुकेश शहाणे या दोघांनीही सभागृहाची दिलगिरी व्यक्त केल्यानंतर वादावर पडदा पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT