सटाणा : तालुक्यात गुरुवारी (दि. 5) सकाळी सर्वत्र जोरदार अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांचे नुकसान होणार असून, विशेषत्वाने अर्ली द्राक्ष उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बागलाण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले.
बुधवारी (दि. 4) सकाळच्या सुमारासही पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागली. परंतु दुपारी ऊन पडल्याने शेतकर्यांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. गुरुवारी (दि. 6) सकाळी 7 च्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यात जवळपास सर्वच भागांत हा पाऊस बरसला. बहुतांश ठिकाणी सर्वत्र शेतात पाणी साचले होते. त्यामुळे काढून ठेवलेला मका भिजून शेतकर्यांची आर्थिक हानी झाली. याव्यतिरिक्त उन्हाळ कांदा रोपेही यामुळे रोगाच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांसाठीही हा पाऊस धोकादायक ठरणार असून, पावसानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात दाट धुके पसरले. या दाट धुक्याचे प्रमाण आणखी काही दिवस याच पद्धतीने टिकून राहिल्यास मात्र उन्हाळी कांदा रोपे पूर्ण खराब होण्याची धास्ती आहे. परतीचा अतिरिक्त पाऊस आणि जमिनीतील वाढलेल्या बुरशीमुळे आधीच कांदा रोपे मोठ्या प्रमाणात खराब झाली आहेत. शेतकर्यांनी अक्षरशः तीन-तीन वेळा बियाणे पेरून रोपवाटिका तयार केल्या आहेत. परंतु पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि दाट धुक्याने वक्रदृष्टी फिरवल्याने शेतकर्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात अर्ली द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. पावसाळ्यात बहार धरल्यानंतर हिवाळा सुरू होण्याच्या प्रारंभी साधारणत: डिसेंबरच्या मध्यानंतर हे उत्पादन काढणीस येते. जागतिक पातळीवर नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर बागलाणमधील ह्या द्राक्षांना मोठी मागणी असते. त्यातून शेतकर्यांना दोन पैसे पाठीशी बांधता येतात. त्यामुळे अतिरिक्त भांडवल खर्च करून तालुक्यातील हिंमतवान द्राक्ष उत्पादक अर्ली द्राक्ष उत्पादन घेण्याचे आव्हान घेतात. परंतु या बेमोसमी पावसाने या द्राक्ष उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सद्यस्थितीत माल परिपक्व होण्याच्या स्थितीत असून, लवकरच तो काढणीला येणार आहे. परंतु तत्पूर्वीच हा बेमोसमी पाऊस बरसल्याने आणि सर्वत्र दाट धुके निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकर्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची धास्ती आहे