घोटी (नाशिक): घोटी शहर व परिसरात दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरु असताना संध्याकाळी सहाच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपून काढले.
अवकाळीने सलग दुसऱ्या दिवशी घोटीला पावसाने झोडपून काढले. शनिवारी (दि.10) रोजी बाजाराचा दिवस असल्याने व्यापारी व नागरिकांची तारांबळ उडाली. त्यात लग्न सराईची दाट तिथी असल्याने वधूवर परिवार व नातेवाईकांची त्रेधातिरपीट उडाली.
जोरदार पावसामुळे शहरातील नाले प्रवाहित झाले. गटारीची घाण पावसाच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्यावर आली. जागोजागी पावसामुळे लहान तलाव साचले होते. जागोजागी कचरा साचल्याने रात्री कुबट वास पसरला. अवकाळीच्या दणक्याने शेतमालाचे विशेषत: बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच वीटभट्ट्यांचे नुकसान झाले आहे.