जिल्ह्यातील ३० गावांमधील १ हजार ९९० शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसला आहे. Pudhari News Network
नाशिक

Unseasonal rain Nashik | अवकाळीचा 1 हजार 298 हेक्टरला तडाखा

बागलाण तालुक्याला सर्वाधिक फटका : द्राक्ष, कांद्याचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १ हजार २९८ हेक्टरला तडाखा बसला आहे. बागलाण तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, जिल्ह्यातील ३० गावांमधील १ हजार ९९० शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसला आहे.

यात द्राक्ष, उन्हाळ कांदा, डाळिंब यासह भाजीपाला व टोमॅटोचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने दिली आहे. राज्यभरासह नाशिक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक शहर व परिसरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, बागलाण, सिन्नर, येवला तालुका व इतर काही भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावत चांगलेच झोडपले होते. गारपिटीसह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले नसले तरी कृषी विभागाने नुकसानीची माहिती मागविली. त्यानुसार बुधवारी झालेल्या अवकाळीने जिल्ह्यातील ३० गावांना झोडपले. बागलाणमध्ये १ हजार १५५ हेक्टर, कळवणला ७५ हेक्टर, दिंडोरी १५ हेक्टर, तर नाशिक तालुक्यात ४२.६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात ६०.६० हेक्टरवरील भाजीपाल्याचे पावसामुळे बाधित झाले. डाळिंब १९.६० हेक्टर, द्राक्ष १९.८० हेक्टर, टोमॅटो १० व गव्हाचे दहा हेक्टर इतके नुकसान नोंदविण्यात आले आहे.

काढणीचा कांदा भिजला

दरम्यान बागलाण, कळवण या तालुक्यांमध्ये उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. सध्या या भागात कांदा काढणीला आला आहे, तर काही भागांत शेतकऱ्यांनी कांदा काढून तो शेतात साठवून ठेवला आहे. अचानकपणे आलेल्या पावसामुळे हा कांदा भिजला. तर काही ठिकाणी शेतातच पाणी साचले होते. त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले. पावसाचा कालावधी कमी असला तरी वेग आणि गारपीट यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

गुरुवारीही पावसाची हजेरी

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. ३) अवकाळी पावसाने हजेरी लावली. चांदवड, नांदगावाला पावसाने झोडपले आहे. दुपारी या तालुक्यांमधील विविध भागांत विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसाने प्रामुख्याने काढणीला आलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT