नाशिक : जिल्ह्यात गत आठ दिवसांत वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसाने आतापर्यंत तीन हजार ८६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक तडाखा हा कांदा व आंबा पीकाला बसला आहे. या नुकसानीत १५ हजार ३३३ शेतक-यांचे नुकसान झाले आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका हा सुरगणा तालुक्यांला बसला असून येथील आंबा पीकाची हानी झाली आहे. या तालुक्यातील १४१ गावे बाधित झाले आहे.
शासकीय यंत्रणांकडून शेतीच्या बांधावर जाऊन पंचनामे केले जात आहेत. त्यामुळे अंतिमत: नुकसानीचे तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही तालुक्यात गारपीट देखील झाल्याने नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. ५ मे ते ११ मे या कालावधीत विविध भागांना पावसाने झोडपले. सर्वच तालुक्यांमध्ये हजेरी लावल्याची नोंद आहे. या अवेळी झालेल्या पावसामुळे तब्बल६५९ गावांमधील शेतीपिकांना फटका बसला आहे. सात दिवसांपासूनच्या पावसामुळे कांदा रोपे, आंबा, डाळिंब, टोमॅटो, गहू, मका, कांदा रोपवाटिका, अंतिम टप्प्यातील द्राक्षे, तसेच भाजीपाला व अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ३०० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. यात पेठ तालुक्यातील सर्वाधिक १०१ घरांची पडझड झाली आहे. तर त्याखालोखाल कळवण तालुक्यातील ५९,बागलाण तालुक्यातील २२, मालेगाव तालुक्यातील २१ घरांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे एका कांदाचाळ, दोन शाळा व एका प्राथमिक आरोग्य केंद्राचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करुन आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. त्याअनुषंगाने राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुककसानग्रस्त भागाची पाहणी करत, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावर, महसूल प्रशासन व कृषी विभागाचे अधिकारी बांधांवर जाऊन पंचनामे करीत आहेत. यातच दरोरजच्या पावसामुळे पंचनाम्यांसाठी आणखी काहीकालावधी लागण्याची शक्यता आहे.