सिन्नर (नाशिक): शहर परिसरात रविवारी (दि. २५) ढगुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला. देवनदी, शिवनदी, सरस्वती या नद्यांसह नाल्यांना पूर येथून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रविवारी (दि. २५) दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर चाललेल्या पावसाने शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे दळणवळण ठप्प झाले. अवघ्या दोन तासांत १४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली आहे.
शहर व उपनगरांतील रस्ते जलमय झाले. विजयनगरच्या सखल भागातील घरात पाणी शिरले. सरदवाडी राेड परिसरातील उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यांवरही हीच परिस्थिती हाेती. नायगाव राेड भागातदेखील रस्त्यांवरुन पाणी वाहत हाेते. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गणेशपेठेतून पाण्याचे लाेट वाहत हाेते.
शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या सरस्वती नदीला पहिल्याच पावसात पूर आला. पडकी वेससह नवापूलावरुन पाणी वाहत हाेते. एकूणच मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले. सायंकाळच्या सुमारास पावसाने उघडीप दिली.
दरम्यान, मुसळधार पावसात सिन्नर - डुबेरे रस्त्यावर सायंकाळी सातच्या सुमारास बाभळीचे झाड उन्मळून एका पिकपवर कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सिन्नर- ठाणगाव हा रस्ता अतिशय वर्दळीचा असून वाहतुकीचा मात्र खोळंबा झाला. रात्री उशिरापर्यंत झाड बाजूला करण्याचे काम सुरू होते.
जवळपास दोन तास मुसळधार पाऊस झाला. त्यातून नाले दुथडी भरून वाहू लागले. देवनदीला मात्र पूर आलेला बघायला मिळाला. ठाणगाव, कुंदेवाडी, मुसळगाव येथील पुलावरून पाणी वाहिले. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुक ठप्प झाली होती.
ठाणगाव परिसरात तसेच उंबरदरी धरणाच्या क्षेत्रात रविवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक झाली. डोंगरदर्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसून आले.
तालुक्यातील ठाणगाव, पाडळी सह परिसर, सोनांबे, कोनांबे शिवार, दापूर, चापडगाव, नायगाव, विंचूर दळवी, पांडुर्ली, डुबेरे, आटकवडे या गावांना पावसाने चांगले झोडपले.