Unseasonal rain  
नाशिक

Unseasonal rain nashik |अवकाळीने सव्वासात हजार हेक्टरला फटका

कांदा, डाळिंब पिकाची हानी; मालेगाव, सटाणा आणि नांदगावला जादा नुकसान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने तब्बल ७३०२ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ७६ गावांमधील ११ हजार २२१ शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक फटका बसला आहे. मालेगाव, सटाणा आणि नांदगाव तालुक्यात नुकसान सर्वाधिक झाले असून कांदा, डाळिंब पिकांची मोठी हानी झाली आहे.

चार ते पाच दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील कळवण, देवळा, दिंडोरी, मालेगाव, सटाणा, नांदगाव, निफाड आणि सिन्नर या आठ तालुक्यांना झोडपून काढले. १८ आणि १९ मार्च असे दोन दिवस गारपिटीसह अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे कांदा, गहू, मका, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेले पीक या नैसर्गिक आपत्तीत सापडले आहे. महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे केले. यात दोन दिवसांत झालेल्या अवकाळीने ७ हजार ३०२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बुधवारी (दि. १८) कळवण, देवळा, दिंडोरी, निफाड आणि सिन्नर तालुक्यातील १३ गावांतील ५५९ शेतकऱ्यांचे २४७.५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. १९) गारपिटीसह अवकाळीने जिल्ह्यात मालेगाव, सटाणा, नांदगाव, निफाड आणि सिन्नर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. या एकाच दिवसात ६३ गावांमधील ७०५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.

काही ठिकाणी काही शेतांत पाणी साचल्याने पंचनाम्यांना अडचणी येत आहेत. हे पंचनामे पूर्ण झाल्यास नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अचानक ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पीकनिहाय नुकसान

  • कांदा - ४ हजार ५६२ हेक्टर

  • डाळिंब - १ हजार ३७७ हेक्टर

  • गहू - ८०२ हेक्टर

  • मका - ४०० हेक्टर

  • भाजीपाला - १८९ हेक्टर

  • द्राक्ष - १२५ हेक्टर

  • इतर फळे - ८ हेक्टर

  • कांदा रोपवाटिका - २ हेक्टर

तालुकानिहाय नुकसान (हेक्टर)

  • मालेगाव - ३ हजार ३११

  • सटाणा - १ हजार ६७३

  • नांदगाव - ८९७

  • निफाड - ७८७

  • सिन्नर - ५७४

  • दिंडोरी - ३३.५०

  • कळवण - २३

  • देवळा -

कांदा पिकाचे मोठे नुकसान

प्राथमिक अंदाजानुसार सर्वाधिक फटका कांदा पिकास बसला. पावसामुळे ४५६२ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले आहे. याशिवाय ८०२ हेक्टरवरील गहू, ४०० हेक्टर मका आणि १८९ हेक्टर भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाने मनमाड परिसरात गहू, कांद्याचे नुकसान

मनमाड : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी रात्री शहर परिसरात अवकाळी पावसाचे आगमन झाले. शहरात हलक्या सरी पडल्या. नागापूर, पानेवाडी परिसरात तर पावसाने कहर केल्यामुळे काढणीला आलेला गहू आणि काढून ठेवलेला कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवेळी येणाऱ्या अस्मानी संकटामुळे आता शेतकरी मेटाकुटीला येऊन हतबल झाला.

मार्चच्या सुरुवातीपासून तापमानात वाढ होऊन पारा ३८ अंशांपर्यंत गेला होता. वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाचे आगमन झाले. शहरापासून ४ ते ७ किमीवरील नागापूर, पानेवाडी भागात वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसास सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेले गव्हाचे पीक आडवे झाले. अनेक शेतकऱ्यांनी उघड्यावर कांदा काढून ठेवल्याने तो खराब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले होते. उन्हाळ्यात अवकाळीमुळे उरलीसुरली पिकेदेखील हातातून जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT