नाशिक : असंघटित कामगारांनाही कामगार कायदा लागू करण्यासाठी संसदेत बिल मांडावे, अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय कामगार व रोजगारमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली आहे. ईएसआयसी रुग्णालयाची क्षमता वाढविण्याची मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी मांडविया यांचे आभारही मानले आहेत.
खासदार वाजे यांनी मंत्री डॉ. मांडविया यांची नवी दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. यावेळी नाशिक व परिसरातील कामगारांच्या समस्या, गरजा आणि आरोग्य सेवांवरील मर्यादा यावर चर्चा केली. सिन्नर येथे प्रस्तावित असलेल्या नवीन ईएसआयसी रुग्णालयाच्या प्रगतीकडे खासदार वाजे यांनी मांडविया यांचे लक्ष वेधले. हजारो औद्योगिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना या रुग्णालयाचा मोठा लाभ होणार असून, या प्रकल्पास गती देण्यासाठी आवश्यक ते प्रशासनिक सहकार्य तत्काळ मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.
नाशिकमधील ईएसआयसी रुग्णालयाची खाटसंख्या आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे १०० वरून २५० झाली आहे. ग्रामीण भागासाठी सिन्नर येथे नवीन ईएसआयसी रुग्णालय उभारले जात आहे. असंघटित कामगारांनाही कामगार कायद्यानुसार सुविधा मिळाव्यात असा माझा सातत्याने आग्रह राहणार आहे.राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
नाशिक शहरातील ईएसआयसी रुग्णालयातील कर्मचारी टंचाई, वैद्यकीय उपकरणांची कमतरता, पॅनलवरील रुग्णालयांची बिले थकल्याने रुग्णसेवेत येणाऱ्या अडचणी आदी समस्या वाजे यांनी मांडल्या. घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम क्षेत्रातील कामगार, हातमजूर यांसारख्या असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही ईएसआयसी, पीएफ आणि पेन्शनसारख्या सुविधा मिळाव्यात यासाठी स्वतंत्र आणि समर्पित कायदा संसदेत मांडावा, अशी मागणी खासदार वाजे यांनी केली. विशेषतः महिलांमध्ये आर्थिक सुरक्षितता आणि आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.