नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | अर्थसंकल्प सादरीकरणासाठी अर्थमंत्री सीतारमण यांच्या साडीच्या निवडीकडे सातत्याने लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. 2019 साली त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पीय सादरीकरणात सोनेरी बॉर्डर असलेली चमकदार गुलाबी मंगलगिरी साडी परिधान केली होती. त्या वर्षी ब्रीफकेसऐवजी पारंपारिक ‘बही खाता’चा पहिला वापर करण्यात आला होता. 2020 साली सीतारमण यांनी पिवळी-सोनेरी रेशमी साडी निवडली होती. 2021 च्या सादरीकरणात त्यांनी लाल आणि ऑफ-व्हाइट पोचमपल्ली रेशमी साडी परिधान केली होती. ज्यावर इकतचे डिजाईन आणि हिरवी बॉर्डर होती. तेलंगणातील भूदान पोचमपल्ली येथे तयार केलेल्या पोचमपल्ली इकतमुळे या शहराला भारताचे ‘रेशमी शहर’म्हणून ओळखले जाते. 2022 साली निर्मला यांनी ओडिशाची बोमकाई साडी निवडली होती. 2023 साली त्यांच्या सातव्या केंद्रीय अर्थसंकल्पीय सादरीकरणासाठी त्यांनी सोनेरी डिझाइनसह मॅजेन्टा बॉर्डर असलेली पांढरी रेशमी साडी निवडली होती. गेल्या वर्षीच्या सादरीकरणासाठी त्यांनी लाल टेम्पल साडी परिधान केली होती, ज्यावर काळ्या बॉर्डरवर सोनेरी काम केले होते. 2024 वर्षाच्या सुरुवातीला अंतरिम अर्थसंकल्पात त्या निळ्या हातमागाच्या साडीत दिसल्या. सीतारमण दिवंगत मोरारजी देसाई यांच्या सलग सहा सादरीकरणांना मागे टाकत सलग सातवे बजेट सादर करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या 2025 या अर्थसंकल्पासाठी महत्त्वाची ठरलेली मधुबनी साडीचे महत्व काय आहे, बघूया...
शनिवार (दि.1) 2025 या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. त्या निमित्ताने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पद्म पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी तयार केलेली मधुबनी कलेने समृद्ध असलेली साडी परिधान केली. दुलारी देवी 2021 च्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट आउटरीच उपक्रमासाठी मधुबनीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी दुलारी देवी यांची भेट घेतली होती. अर्थसंकल्प सादरीकरणासाठी अर्थमंत्री सीतारमण यांच्या मधुबनी साडीच्या निवडीकडे सातत्याने लोकांचे लक्ष वेधले गेले आहे.
बिहारमधील मधुबनीसाठी दुलारी देवींना 29 मे 2021 रोजी मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा असा सातवा पुरस्कार आहे. बिहारमधील दुलारी देवींचा ‘पद्मश्री’ पुरस्कारापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. बिहारमधील मधुबनी जिल्ह्यामधील राटी या छोट्याशा गावात एका मासेमारी करणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आईवडिलांनी वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांचं लग्न लावून दिले होत. सासरी त्यांच्या नशिबी वेदनाच आल्या. काही वर्षे त्यांनी कशीबशी काढली. त्यानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. परंतु, सहा महिन्यांची असतानाच त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. नंतर मात्र त्या माहेरी कायमच्याच परत आल्या.
माहेरी परत आल्यावर त्या आपल्या आईसोबत घरकाम करू लागल्या. त्यांनी पद्मश्री महासुंदरीदेवी आणि त्यांच्या जाऊबाई चित्रकार कर्पूरीदेवी यांच्या घरी काम करण्यास सुरुवात केली होती. केर-लादी करताना, भांडी घासताना अधूनमधून दुलारी देवी त्या दोघींच्या चित्रांचं निरीक्षण करत असत. दुलारी देवी सांगतात, ‘‘मी चित्र करायला शिकले तेव्हापासून चित्रनिर्मितीला मी देवपूजा मानते. एक दिवस जरी ही पूजा माझ्या हातून घडली नाही तरी मी अस्वस्थ होते.’’ कर्पुरीदेवींनी त्यांना मुलीप्रमाणे मानलं आणि खूप प्रेम दिलं. दुलारी देवी त्यांना ‘दायजी’ म्हणत. शासनातर्फे मधुबनी चित्रकलेचा एक प्रशिक्षण कार्यक्रम कर्पुरीदेवींकडे राबवला जाणार होता. त्या कार्यक्रमात दुलारीदेवी सामील झाल्या. बॉर्डर, रेषा, स्केच या गोष्टी दुलारी देवी शिकल्या. दायजींनी त्यांना स्वत:चं नाव आणि गावाचं नाव लिहिण्यासही शिकवलं. दुलारी देवी सांगतात की, “कर्पूरीदेवी स्पृश्य-अस्पृश्य भेद मानत नसत. त्यांनी त्यांच्या घरी मला राहाण्यास सांगितलं, आईसारखी माया दिली.” याचेच फलित म्हणून दुलारी देवी उत्तम चित्र काढू लागल्या.
1999 साली त्यांच्या चित्राला ललित कलेचा पुरस्कार मिळाला. 2012 मध्ये राज्य पुरस्कार मिळाला. शिक्षाकला माध्यम संस्थेद्वारे बंगळूरुमधील विविध शिक्षण संस्था, सरकारी, गैरसरकारी इमारतींच्या भिंतींवर मधुबनी चित्रं काढण्याचं काम सलग पाच वर्ष त्यांनी केलं. भारतात अनेक ठिकाणी मधुबनी चित्रांच्या कार्यशाळा घेतल्या. बिहारची राजधानी पटना येथील कलासंग्रहालयात त्यांचं ‘कमलेश्वरी’ हे कमलानदी पूजेचं चित्र आहे. ‘तारा बुक’तर्फे ‘फॉलोइंग माय पेंट ब्रश’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. यात दुलारी देवीची आत्मकथा चित्ररूपात आहे. मार्टिन ली कॉज यांच्या ‘अ मिथिला’ या फ्रेंच भाषेतील पुस्तकात दुलारी देवींच्या पेंटिंगचं सुंदर वर्णन आलं आहे. राटी गावातील मधुबनी चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त एका रंगातील, रेषांमधील चित्र. या प्रकाराला ‘कझनी’ असं म्हटले जाते. तर रंग भरलेल्या चित्राला ‘भरनी’ असं म्हणतात. कझनी आणि भरनी या दोन्ही तंत्रांत दुलारी देवी कुशल आहेतच, याशिवाय ‘धरती भरना’(पूर्णपणे रंगवणं), चित्राच्या सर्व बाजूंनी विस्तृत किनार, उत्स्फूर्तता, सहजता, हे सर्व त्या उत्तम प्रकारे साधत आहेत.
मधुबनी चित्रकला केवळ एक लोककला नसून, ती संपूर्ण जगात भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचे प्रतीक ठरली आहे. दुलारी देवींसारख्या कलाकारांनी या कलेला जागतिक ओळख मिळवून दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाच्या निमित्ताने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मधुबनी कलेने समृद्ध असलेली साडी परिधान करून या कलेचा गौरव केला आहे. यामुळे केवळ बिहारमधील या प्राचीन परंपरेला नवसंजीवनी मिळत नाही, तर भारतीय हस्तकलेला जागतिक व्यासपीठावर महत्त्व मिळते. मधुबनी चित्रशैली आणि तिच्या कलाकारांचा हा गौरव पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.