मंत्रिपदाची हुलकावणी; मुंबईतील ४ आमदार नाराज file photo
नाशिक

Nashik MLC Historical Trend | बहुमताला हुलकावणी, उमेदवाराला पसंती !

Nashik MLC Historical Trend | नाशिक विधान परिषदेचा 'तो' रंजक इतिहास पुन्हा जिवंत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात 'कमी मतदार संख्या असणाऱ्याचाच विजय' हे अनोखे समीकरण यंदाही कायम राहिले असून, अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी या परंपरेच्या जोरावरच बाजी मारली आहे. कागदावर प्रचंड बहुमत असूनही बलाढ्य उमेदवारांना पराभवाचा धक्का बसणे आणि कमी मते पाठीशी असलेला उमेदवार विजयी होणे, हा या मतदारसंघाचा जुना इतिहास आहे.

निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच या सूत्रावर अचूक बोट ठेवत गोकुळ गिते यांनी, 'येथे बहुमताला नव्हे, तर उमेदवाराच्या चेहऱ्याला प्राधान्य असते; मी मतदारांमधील सुप्त उद्रेक स्वतः पाहिला असल्याने विजय माझाच होणार,' असा ठाम दावा केला होता. गितेंच्या या ऐतिहासिक विजयामुळे नाशिक मतदारसंघाची ही अनोखी परंपरा तर राखली गेलीच, पण त्यांची ती राजकीय भविष्यवाणीही तंतोतंत खरी ठरली आहे.

या मतदारसंघाने आजवर अनपेक्षित निकाल दिलेले आहेत. १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उदयाला आला होता अन् लागलीच आघाडीचे सरकार सत्तेत आले. यानंतर राष्ट्रवादीने सन २००२ मध्ये या मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे केवळ दोन मतदार होते. मात्र, रिंगणात उतरलेले माजी खासदार देवीदास पिंगळे हे विजयी झाले.

सन २००४ मध्ये देवीदास पिंगळे लोकसभा निवडणूक लढले अन् विजयी झाले. त्यावेळी त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला. त्यामुळे येथे पोटनिवडणूक झाली. त्यावेळी माजी खासदार स्व. वसंतराव पवार विजयी झाले. २००७ च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद वाढली होती. यानंतर झालेल्या निवडणुकीतही स्व. पवार यांनी विजय संपादन केला. परंतु २०१० मध्ये त्यांचे निधन झाल्याने या मतदारसंघासाठी पुन्हा पोटनिवडणूक झाली. यात माजी आमदार जयवंत जाधव विजयी झाले.

२०१२ मध्ये झालेल्या नियमित निवडणुकीत राष्ट्रवादीचे जाधव यांना शिवसेनेच्या शिवाजी सहाणे यांनी टक्कर दिली. त्यावेळी शिवसेनेची मतदारसंख्या राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीपेक्षा कमी होती. मात्र, सहाणे यांनी थेट निवडणूक ही टाय-टाय केली होती. मात्र, चिठ्ठीने जाधव यांना कौल दिला. २०१८च्या निवडणुकीत शिवसेनेने ही जागा लढविली. त्यावेळी महापालिकेत सत्ता होती. तसेच जिल्ह्यातही भाजपचे प्राबल्य होते.

मात्र, शिवसेनेची संख्या कमी असूनही नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांचा धुव्वा उडविला होता. यंदाच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीचे मोठे प्राबल्य होते. त्यांच्याकडे एकूण ६१८ मतदारसंख्या पैकी तब्बल ४६६ संख्या होती. त्यामुळे त्यांचे पारडे जड होते. मात्र, असे असतानाही नगण्य केवळ १०५ मतदारसंख्या असलेल्या महाविकास आघाडीची साथ घेऊन गोकुळ गिते अपक्ष रिंगणात उतरले. मतदारसंघाचा इतिहास बघता मतदारांनी गितेंना साथ देत विधान परिषदेत पोहोचवले.

गितेंचा तो दावा ठरला खरा

निवडणूक लागल्यापासून गोकुळ गिते या मतदारसंघातील निवडणुकीचा इतिहास मांडत, कमी मतदारसंख्या असलेल्याच्या बाजूने मतदारांचा कौल असतो असा दावा करत होते. महायुतीच्या नेत्यांना पहिल्या दिवसापासून ज्या छुप्या मतदानाचा संशय होता, तो आज निकालातून पूर्णपणे खरा ठरल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील संख्याबळानुसार भाजप आणि महायुतीचे पारडे जड असतानाही, बंडखोर गोकुळ गिते यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. ग्रामीण आणि शहरी भागातील महायुतीची मते फुटल्यामुळेच गोकुळ गिते यांचा हा एकतर्फी विजय सुकर झाला. 'मी मतदारांचा उद्रेक पाहिला होता, त्यामुळे मीच जिंकणार,' हा गोकुळ गितेंचा दावा अखेर निकालाच्या दिवशी खरा ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT