उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार : देसाई pudhari photo
नाशिक

उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार : देसाई

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल. मुख्यमंत्री पदी पुन्हा उद्धव ठाकरे विराजमान होतील, असा विश्वास व्यक्त करत भाजपसह विरोधकांना धडा शिकविण्यासाठी शिव सर्वेक्षण अभियान राबविण्यात येणार असून, शिवसैनिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प करावा, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे सचिव अनिल देसाई यांनी केले.

विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर शालिमार चौकातील शिवसेने (ठाकरे गट)च्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. ठाकरे गटाच्या शिवसंपर्क अभियानाविषयी देसाई यांनी माहिती दिली. या अभियानांतर्गत शिवसैनिकांनी आमदार, तालुकाप्रमुख महिला आणि मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांचे संपर्क नंबर गोळा करायचे आहेत. पक्षाची सद्यस्थिती, राजकीय वातावरण आणि विशेष बाब म्हणजे नवीन नोंदणी व दुबार नोंदणी किती झाली तसेच सध्या ऑनलाइन नोंदणी किती झाली, याची तसेच भगव्या सप्ताहाच्या फलनिष्पत्तीची माहितीही प्राप्त करायची आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात बूथनिहाय झालेले मतदान याबाबत चर्चा करावी आणि मतदानवाढीसाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत शिवसर्वेक्षण उपक्रमांतर्गत चर्चा होणार आहे, अशी माहितीही यावेळी देसाई यांनी दिली.

अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. पक्षाचे कोणतेही अभियान राबविण्यासाठी तसेच जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्यास तसेच संपर्क यंत्रणा अधिक भक्कम करून समाजातील सर्व घटकांपर्यंत पक्षाचा विचार पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड आणि जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर पक्ष सचिव प्रवीण महाले, नितीन आहेर, गणेश धात्रक, कुणाल दराडे, आ. नरेंद्र दराडे, लोकसभा संघटक निवृत्ती जाधव, कोर कमिटी सदस्य डी. जी. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

विधानसभानिहाय आढावा

देसाई यांनी निफाड, येवला, नांदगाव, दिंडोरी-पेठ, कळवण-सुरगाणा, चांदवड, सिन्नर, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी शिवसैनिकांनी संकल्प करावा, असे आवाहन देसाई यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT