नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नगरसेवकांच्या कथित फुटीच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवल्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः सूत्रे हाती घेतली आहेत. नाशिकमधील सर्व १५ नगरसेवकांसह स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांना बुधवारी (दि. १५) दुपारी १२ वाजता मुंबईत 'मातोश्री'वर पाचारण करण्यात आले असून, त्यांच्या उपस्थितीत पक्षस्थितीचा आढावा घेत एकनिष्ठतेची खात्री केली जाणार आहे.
महापालिकेतील १५ पैकी १२ नगरसेवक शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनंतर ठाकरे गटाने तातडीने डॅमेज कंट्रोल सुरू केले होते. पक्षाचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी शनिवारी नाशिकमध्ये बंद दाराआड नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्येकाची भूमिका जाणून घेतली. नगरसेवकांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा शब्द दिल्याचे सांगण्यात येत असून, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वतीने सर्वांचे अभिनंदनाचे संदेशही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वी गटनेते केशव पोरजे यांनी पत्रकार परिषद घेऊन फुटीच्या चर्चांचा ठाम नकार केला होता. त्यांनी १५ पैकी १३ नगरसेवकांना माध्यमांसमोर उपस्थित करत सर्व नगरसेवक पक्षासोबत असल्याचा दावा केला. काही मध्यस्थांमार्फत नगरसेवकांना पक्षांतरासाठी आमिषे दाखवली जात असून, १० नगरसेवक आणल्यास उपमहापौरपद आणि विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांनी, ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांनी आधी नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निवडून आलो असून, पक्षत्याग करणाऱ्यांचे सदस्यत्व रद्द होईल, असा इशारा दिला होता.
दरम्यान, पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याबाबत अस्वस्थतेच्या चर्चा सुरू असून, त्यांच्या माध्यमातून काही नगरसेवकांशी संपर्क साधला जात असल्याची चर्चा पक्षांतर्गत रंगली आहे. त्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
बुधवारी होणाऱ्या 'मातोश्री' बैठकीत उद्धव ठाकरे सर्व नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र संवाद साधून राजकीय घडामोडी, पक्षातील वातावरण आणि पक्षनिष्ठेबाबत प्रत्यक्ष अभिप्राय जाणून घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे केवळ नाशिकच नव्हे, तर राज्याच्या राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. ठाकरे गटातील फुटीच्या चर्चांना पूर्णविराम मिळतो की पुढील राजकीय घडामोडींना वेग येतो, हे या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.