सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटेंसमोर उदय सांगळे यांचे आव्हान File Photo
नाशिक

Uday Sangle vs Manikrao Kokate | 'माझा खरातशी संबंध नाही, पण कोकाटे परिवाराच्या अघोरी पूजांची चौकशी करा!' उदय सांगळेंचे सडेतोड उत्तर

Uday Sangle vs Manikrao Kokate | खरात संस्थान विकासात आ. कोकाटे यांच्या कार्यकाळात भर : सांगळे

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

भोंदू कॅप्टन अशोक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून, आमदार माणिकराव कोकाटे समर्थक नगरसेवक पंकज जाधव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजप युवा नेते उदय सांगळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माझा आणि अशोक खरातचा दुरान्वये संबंध नसल्याचे सांगत सांगळे यांनी आरोप फेटाळले आहे.

सांगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कोकाटे परिवारावर टीका करताना, विद्यमान आमदारांच्या पहिल्या निवडणुकीपासून विविध धार्मिक व आघोरी पूजांमध्ये कोकाटे परिवाराचा सहभाग असल्याचा आरोप केला.

तसेच खरातच्या शिवनिका संस्थानच्या विकासाच्या काळात कोकाटे आमदार असताना अनेक बाबी घडल्याचा उल्लेख करत, दारणा नदीतून पाणी परवानगी प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. सिनर शहरात पाणीटंचाई असताना मोठ्या प्रमाणात पाणी परवानगी देण्यात आली, याबाबत जबाबदारी निश्चित करावी, असे सांगळे यांनी नमूद केले.

तसेच भोंदूगिरीला खतपाणी मिळाल्याबाबतही त्यांनी कोकाटेंवर टीका केली. मागील काही महिन्यांत कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तसेच इतर प्रकरणांमुळे तालुक्याची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत, आरोप करताना कोकाटे यांच्या बगलबच्चांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

खरात संस्थानच्या विश्वस्त मंडळात कोकाटे समर्थकांचा सहभाग असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. दरम्यान, या प्रकरणामुळे सिन्नरच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली असून, येत्या काळात आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

'राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेवर टीका करणे दुर्दैवी'

याशिवाय, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील अपुऱ्या योगदानावरूनही सांगळे यांनी कोकाटेंवर निशाणा साधला. अनेक वर्षे काम सुरू असलेले क्रीडा संकुल पूर्णत्वास गेलेले नाही. उलटपक्षी आम्ही क्रीडा स्पर्धांना पाठवळ दिले.

कबड्डी स्पर्धेच्या प्रवेशद्वाराला स्व. अजितदादा पवार यांचे नाव दिले आहे. त्यामुळे सिन्नरमध्ये होत असलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांवर टीका करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT