आंतरराष्ट्रीय नाट्य महाेत्सव सुरु करणार असल्याची उद्योगमंत्री सामंत यांनी घोषणा केली. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Uday Samant |आंतरराष्ट्रीय नाट्य महाेत्सव सुरु करणार : उद्योगमंत्री सामंत यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मराठी नाटकांना विश्वस्तरावर पोहचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे महाराष्ट्रात लवकरच आंतरराष्ट्रीय नाट्य महाेत्सवास सुरू करणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी केली.

अ. भा. मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेतर्फे पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवारी (दि.२६) महाकवी कालिदास कलामंदिरात पार पडला. पुरस्कार्थींना गौरवल्यानंतर मंत्री सावंत बोालत होते. व्यासपीठावर आ. देवयानी फरांदे, नाटय परिषद मुंबई शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कोषाध्यक्ष सतिश लाेटके, नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, संजय रहाटे, शिवाजी शिंदे, संजय दळवी आदी उपस्थित होते.

वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार अशोक हंडे यांना तर प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला. ३१ हजार रूपये, मानपत्र आणि स्मतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप होते. ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांना बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्काराने गौरवण्यात आले. १५ हजार रूपये सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्कारचे स्वरुप होते.

मंत्री सावंत याप्रसंगी म्हणाले, ज्या पुरस्कार्थींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ते सर्व कलाकार जमिनीवर पाय ठेऊन यशाच्या आकाशात उत्तुंग झेप कशी घ्यावी याचे मूर्तीमंत उदाहरण आहेत. नाटयपरिषदेच्या राज्यभरातील शाखांनी मराठी रंगभूमी सशक्त, संपन्न होण्यासाठी जवाबदारी स्वीकारुन त्यादृष्टीने काम करावे अशी अपेक्षाही सावंत यांनी व्यक्त केली. नाटय परिषदेसाठी काम करताना मंत्री म्हणूनही जवाबदारी स्वीकारली असल्याचे सांगून सावंत यांनी नाट्य परिषदेला जो निधी दिला त्याचा विनयोग याेग्य ठिकाणी अाणि पारदर्शीपणे करावा, असे यावेळी सांगितले. नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे होणारा पुरस्कार साेहळा राज्यातील इतर शाखांमध्येही सुरु होण्यासाठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळातील सदस्यांना राज्यभरात शाखांमध्ये पाठवून असे प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कला, रंगभूमीचा विकास करण्यासाठी सरकार नेहमी कलावंतासोबत असेल अशी ग्वाहीही मंत्री सामंत यांनी यावेळी दिली. पुरस्काराल उत्तर देताना जब्बार पटेल म्हणाले, 'प्रेमा तुझा रंग कसा' या प्रा. वसंत कानिटकर यांच्या नाटकाने रंगभूमीवर काम करण्यास सुरु केली त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळत आहे हे भाग्य आहे.

पुरस्कार म्हणजे मराठी कलेचा सन्मान

कुसुमाग्रज यांचे साहित्य आयुष्यात आल्यानंतर लेखनाचे स्फुरण चढले त्याच्या नावाने पुरस्कार मिळाला याचा अत्यानंद आहे असे सांगून अशोक हंडे यांनी हा पुरस्कार म्हणजे मराठी कलेचा सन्मान आहे. हा पुरस्कार मी माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना समर्पीत करतो, असे नमूद केले.

दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते नाट्य परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. नाशिकच्या 'अ. डील' एकांकिकेला मिळलेल्या पारितोषिकांबद्दल सर्व कलाकारांचा तसेच चारुदत्त दीक्षित यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी केले. सूत्रसंचालन शिबानी जोशी यांनी केले.

तुतारीचा प्रचार करु नका

प्रारंभी मंत्री सावंत यांंनी राजकीय भाष्य करणार नाही असे सांगत, तुतारी वाजवणाऱ्या कलावंताचे काैतुक करताना तुतारी वाजवणे चांगले आहे. परंतु 'तुतारी'चा प्रचार करु नका असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. नाशिककर रसिक हे गर्दी करणारे प्रेक्षक नव्हे तर दर्दी रसिक आहेत, त्यामुळे येथे गर्दी नाही दर्दी लोक आहेत अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT