Malegaon Chalisgaon Road Accident Pudhari
नाशिक

Nashik Accident | बस-आयशरची भीषण धडक: दोन महिला ठार; ३० प्रवासी जखमी, काहींची प्रकृती गंभीर

मालेगाव-चाळीसगाव मार्गावरील दहिवाळ शिवारात अपघात

पुढारी वृत्तसेवा

Malegaon Chalisgaon Road Accident

मालेगाव : मालेगाव-चाळीसगाव मार्गावरील दहिवाळ शिवारात बुधवारी (दि.१९) सकाळी बस आणि आयशर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन महिला प्रवाशांचा मृत्यू झाला. तर बसचालक व वाहकासह सुमारे ३० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक एमएच ४० वाय ५८२२ मालेगावहून चाळीसगावच्या दिशेने जात होती. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दहिवाळ शिवारात विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक एमएच १९ सीवाय ८५२५ सोबत बसची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की बसमधील अनेक प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णवाहिकांच्या माध्यमातून शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी मदतकार्याला सहकार्य करत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. मृत महिलांची तसेच जखमी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

या भीषण अपघातामुळे मालेगाव-चाळीसगाव मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दोन्ही वाहनांच्या चालकांची माहिती घेऊन अपघाताच्या कारणांचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT