Pune Police Sub Inspector News Pudhari
नाशिक

Adgaon Flyover Accident | आडगाव उड्डाणपुलावर भीषण अपघातांची मालिका; एकाच दिवशी झालेल्या दोन दुर्घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

Adgaon Flyover Accident | एकाच दिवशी दोन दुर्घटना; कारमधील दोघांची प्रकृती गंभीर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आडगाव येथील मेडिकल फाट्यावरील उड्डाणपुलावर शनिवारी (दि. १०) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा लागला. पहाटे ट्रकला धडकून झालेल्या भीषण अपघातात भूषण सोनवणे (२३) यांचा मृत्यू झाला. याच दिवशी सकाळी महाविद्यालयात जाताना धनश्री चंद्रकांत सोनवणे (२०) हिचाही अपघातात मृत्यू झाला.

एकाच दिवसात दोन तरुणांचा बळी गेल्याने मेडिकल फाट्यावरील उड्डाणपुलावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास अंबड येथून पारोळ्याकडे जाणारी कार (एमएच ५४ बी ०२९८) आडगाव उड्डाणपुलावरून जाताना ट्रकने ओव्हरटेक केल्याने चारचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार ट्रक (एमएच ०९ एमपी ९३२२) च्या मागील भागावर आदळली.

या चारचाकीतून चार जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता अधिक असल्याने भूषण सोनवणे यांचा मृत्यू झाला, तर रवींद्र मोहन महाजन, मजूषा भावेश महाजन आणि अन्य एका प्रवाशाला दुखापत झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मंजूषा महाजन यांच्या चेहरा, हनुवटी आणि गुढ्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, याच दिवशी सकाळी दहाच्या सुमारास दुसरा अपघात झाला. ओझर येथील एचएएल परिसर राहणारी धनश्री चंद्रकांत सोनवणे ही मोपेडवरून के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्याලयाकडे जात होती.

यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील एका वाहनाशी तिची धडक झाली. या अपघातात धनश्रीचा मृत्यू झाला. शिक्षणासाठी घरातून बाहेर पडलेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही अपघातांची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पहिल्या अपघातातील ट्रकचालकाचा शोध सुरू असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. एकाच दिवशी घडलेल्या दोन दुर्घटनांमुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT