नाशिक : नाशिक शहरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालत अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 15 चोरीच्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण पाच गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे 8.70 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत हरिचंद्र गुलाब वड (वय 21) व कांतीलाल लक्ष्मण दिघे (वय 25, दोघेही रा. सायलपाडा, ता. सुरगाणा, जि. नाशिक) या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून विविध ठिकाणांहून चोरलेल्या 15 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. 7 जानेवारीला योगेश आबाजी शेवाळे (वय 30, रा. सिडको, नाशिक) यांनी भावाच्या नावावर असलेली बजाज पल्सर (एमएच 18, एव्ही 5132) चोरीस गेल्याची तक्रार अंबड पोलिसांकडे दाखल केली होती.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाला सिडकोत पासवाडी (पाटीलनगर) परिसरात चोरीची मोटारसायकल घेऊन एक व्यक्ती उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून हरिचंद्र वड यास चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार कांतीलाल दिघेसोबत अंबड तसेच नाशिक शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
आरोपींकडून सायलपाडा, हस्तेपाडा, बारी आमदेपाडा, सांभरपाडा (ता. सुरगाणा) या ग्रामीण भागातून पंचासमक्ष 15 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या कारवाईत अंबड 2, सरकारवाडा 1 व पंचवटी पोलिस ठाण्यातील 2 असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत व पोलिस निरीक्षक (गुन्हे) सचिन खैरनार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील विलास पडोळकर, योगेश देसले, अनिल गाढवे, संजय सपकाळे, मयूर पवार, फरीद इनामदार, तुषार मते, प्रवीण राठोड, वैभव एखंडे आदींनी ही यशस्वी कामगिरी बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास योगेश देसले व पोलिस शिपाई वैभव एखंडे हे करत आहेत.