Bangladeshi Illegal Immigrants  Pudhari File Photo
नाशिक

Bangladeshi Illegal Immigrants | नाशिकरोडवर दोन बांगलादेशी नागरिकांना बेड्या; ATS ला पोलिसांकडून माहिती सादर!

Bangladeshi Illegal Immigrants | दोन बांगलादेशी नागरिक नाशिकरोडला जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारत-बांगलादेश सीमेवरून वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करून नाशिकमार्गे पुण्याकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना नाशिकरोड परिसरातून गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने जेरबंद केले. मोहम्मद साकीब मुल्ला (२२) आणि नाहिदा बादशाह मुल्ला (२१) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांकडे भारतात प्रवेशासाठी कोणतीही वैध प्रवासी कागदपत्रे अथवा परवानगी नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी नाशिकमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. तपासादरम्यान पोलिस हवालदार प्रदीप नन्नावरे आणि पोलिस अंमलदार संतोष सुपेकर यांना नाशिकरोड बसस्थानकातून दोन बांगलादेशी पुण्याला जाणार असल्याची माहिती मिळाली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलिस हवालदार प्रदीप नन्नावरे, पोलिस अंमलदार संतोष सुपेकर, मनोज शिंदे, प्रवीण वानखेडे, तसेच नाशिकरोड दामिनी पथकाच्या महिला पोलिस अंमलदार सोनाली किरण बागूल आणि ज्योती रोहिदास पवार यांच्या पथकाने नाशिकरोड बसस्थानक परिसरात सापळा रचत मोहम्मद साकीब मुल्ला आणि नाहिदा बादशाह मुल्ला यांना ताब्यात घेतले.

दोघेही बांगलादेशातील नराईल जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दोघांनी भारत-बांगलादेश सीमेवरून भारतात घुसखोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आहेर करीत आहेत.

शहरात शोधमोहीम

नाशिक शहरात गेल्या दोन वर्षांत सहा बांगलादेशी नागरिक आढळल्याने पोलिसांकडून सातत्याने तपास मोहीम राबविली जात आहे. विशेषतः सातपूर, अंबड, नाशिकरोड येथे बांधकाम साईटवर अनेक बांगलादेशी मजूर काम करत असल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी शहरभर बांगलादेशी नागरिक शोधण्याची मोहीम राबविण्याचे आदेश विविध गुन्हे पथकांना दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT