Nandur Madhameshwar Bird Sanctuary  
नाशिक

Nandur Madhameshwar Bird Sanctuary | सोनेरी डोळ्यांचा पाहुणा नांदूरमध्यमेश्वरमध्ये दाखल!

Nandur Madhameshwar Bird Sanctuary | साइबेरिया, आइसलँडमधून हजारो लाखांचा प्रवास; टफ्टेड डकने वेधले पक्षिप्रेमींचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

युरोपियन सायबेरिया आणि आइसलँडच्या अतिथंड प्रदेशातून हजारो मैलांचा खडतर प्रवास करून, सोनेरी डोळ्यांचा आणि डोक्यावर आकर्षक तुरा असलेला 'टफ्टेड डक' नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात दाखल झाला आहे.

हिवाळी स्थलांतराच्या काळात या पाणथळ क्षेत्रावर आलेल्या या परदेशी पाहुण्याच्या आगमनाने पक्षिप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांचे लक्ष वेधले आहे. गडद काळ्या रंगाचे चकाकणारे पंख, लख्ख सोनेरी-पिवळे डोळे आणि डोक्यावर मुकुटाप्रमाणे दिसणारा आकर्षक तुरा ही या बदकाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

त्याच्या वेगळ्या रूपामुळे पाणथळ क्षेत्रातील इतर पक्ष्यांमध्ये तो सहज ओळखता येतो. काळ्या रंगाच्या पंखांवर सोनेरी डोळ्यांची ठेवण आणि डोक्यावरील तुऱ्यामुळे या पक्ष्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

टफ्टेड डक हा केवळ पाण्यावर तरंगणारा पक्षी नसून पाण्याखाली डुबक्या मारून अन्न शोधण्यातही तरबेज आहे. पाण्याच्या तळाशी जाऊन शंख-शिप्ले आणि इतर जलचर शोधून तो आपली भूक भागवतो. अंधूक प्रकाशामध्येही त्याचे सोनेरी-पिवळे डोळे स्पष्ट दिसतात. धोका जाणवल्यास तो अचानक पाण्याखाली डुबकी मारून अदृश्य होतो आणि काही अंतरावर पुन्हा पाण्याबाहेर येतो. त्याची ही हालचाल पाहणे पक्षीनिरीक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरते.

नांदूरमध्यमेश्वर पाणथळ क्षेत्र स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे अधिवास ठरत असून, विविध देशांतून येणाऱ्या पक्ष्यांमुळे या परिसरातील जैवविविधतेत भर पडत आहे. टफ्टेड डकसारख्या परदेशी पाहुण्यांचे निरीक्षण करण्याची संधी पक्षिप्रेमींना मिळत आहे.
नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी पक्षिप्रेमींना या सोनेरी डोळ्यांच्या तुऱ्यावाल्या पाहुण्याला पाहण्यासाठी नांदूरमध्यमेश्वरला भेट द्यावी, असे आवाहन केले आहे. पक्ष्यांचे निरीक्षण करताना शांतता राखली आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT