Trimbakeshwar Temple file photo
नाशिक

Trimbakeshwar Temple: दर्शनासाठीची ९ हजार रक्कम महत्त्वाची नाही तर मोठं रॅकेट; पोलिसांचा कोर्टात दावा, कडलकला पोलीस कोठडी

त्र्यंबकेश्वर मंदिरात देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मोहन कारंडे

Trimbakeshwar Temple

नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिरात देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग आणि गोटीराम पेहरेला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दर्शनासाठीची घेतलेली ९ हजार ही रक्कम महत्वाची नाही, तर यामागे मोठे रॅकेट असल्याचा दावा पोलिसांचा न्यायालयात केला.

सोमवारी रात्री पुरुषोत्तम कडलग याला अटक केल्यानंतर आज (दि. १४) न्यायालयात हजर करण्यात आले. त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली ३ भाविकांकडून ९ हजार रुपये घेतल्याचा आणि दर्शनासाठी काळाबाजाराचं मोठं रॅकेट चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. कडलग आणि पेहरेला २० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती ए.जी.बेहरे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली.

यावेळी सरकारी वकीलांनी युक्तिवादात केला की, देवस्थान १२ ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. देवदर्शनासाठी विश्वस्त बनावट व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्रेशन करून भोळ्या भाबड्या नातेवाईकांची फसवणूक करतात. नातेवाईकांच्या नावाने हे रॅकेट चालविले जाते. ९ हजार ही रक्कम महत्वाची नाही, तर रॅकेट किती मोठं आहे याचा तपास होणे गरजेचे आहे. भाविकांची फसवणूक करण्यात ट्रस्टी सहभागी आहेत. यात अनेक लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. जगभरात त्र्यंबकेश्वरची वेगळी ओळख आहे. काही विधी फक्त त्र्यंबकेश्वरलाच होतात. आधीच नाशिकचे नाव खराब होत असताना त्यात ही एक भर पडली आहे. त्यामुळे संशयित आरोपीला १० दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

दरम्यान, भाविक ओळखीचे आहेत म्हणून दर्शन द्या असे सांगू शकतात. इतर आरोपी फरार आहेत म्हणून कडलग यांना पोलीस कोठडी द्यावी, हे संयुक्तिक नाही. याचा राजकारणाशी काही संबंध नव्हता, तशी कोणतीही गोष्ट समोर आलेली नाही. न्यायालयात चौकशीला लागेल तेव्हा पुरावा नोंदविला जाईल, असे कडलग याच्या वकीलांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT