नाशिक

Nashik news | विश्वस्त कडलक ताब्यात

त्र्यंबकेश्वर दर्शनाचा काळाबाजार; तीन हजारांत १० मिनिटांत दर्शन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त तथा शरद पवार गटाचे राज्य कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक आणि त्यांचा साथीदार गोटीराम मनाजी पेहेरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तर कडलकचा पुतण्या अभिषेक व ओम कडलक सध्या फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने पुरुषोत्तम कडलक व पेहेरे यांना सात दिवसांची म्हणजे २० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून पोलिसांकडे येत होत्या. ११ एप्रिल रोजी पंचवटी येथील काही भाविक दर्शनासाठी गेले असता त्यांनी अधिकृत २०० रुपयांचा पास घेतला होता. मात्र रांगेत उभे असताना आरोपींनी त्यांना ४ ते ५ तास लागतील; मात्र १० मिनिटांत दर्शन घडवून देतो, असे आमिष दाखवत एका भाविकाकडून तीन हजार रुपये, तर इतरांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सुरुवातीला गोटीराम पेहेरे आणि अभिषेक कडलक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. गोटीरामला तत्काळ अटक करण्यात आली; मात्र अभिषेक फरार झाला. पुढील तपासात या संपूर्ण रॅकेटमध्ये विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, अधिकृतपणे व्हीआयपी दर्शनासाठी २०० रुपयांची फी असताना काही एजंट भाविकांकडून ३ हजार ते १२ हजार रुपये वसूल करत होते. पूर्व दरवाजातून ट्रस्टच्या अधिकाराचा वापर करून १०० ते १५० भाविकांना थेट दर्शनासाठी सोडले जात असल्याचा प्रकारही उघड झाला आहे. या प्रकरणात आणखी काही ट्रस्टी किंवा एजंट सहभागी असल्याचा संशय व्यक्त होत असून, त्यांचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, या कारवाईनंतर देवस्थानच्या विश्वस्त निवड प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पावित्र्याला धक्का देणाऱ्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कडलक यास नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, त्र्यंबकेश्वर देवस्थानची व्याप्ती मोठी असून, या प्रकरणाचा तपास करणे गरजेचे आहे. विश्वस्तपदाचा गैरवापर करून हे रॅकेट चालवले जात असल्याचा संशय आहे, त्यामुळे १० दिवसांची कोठडी द्यावी. दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावला. मात्र, न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कडलक यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT