त्र्यंबकेश्वर: मंदीरबाहेर आंदोलन करताना रिक्षाचालक. file
नाशिक

Trimbakeshwar Temple | त्र्यंबक देवस्थानाविरोधात रिक्षाचालकांचे आंदोलन

मंदिर ट्रस्टींनी बदनामी केल्याचा निषेध

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : दर्शनासाठी रिक्षाचालक भाविकांकडून पैसे घेत असल्याचे मंदिर देवस्थानाच्या एका विश्वस्तांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास शेकडो रिक्षा चालकांनी ठिय्या आंदोलन केले. देवस्थान ट्रस्टने माफी मागावी, अशी मागणी रिक्षा चालक मालक संघटनेने केली. या आंदोलनात त्र्यंबकेश्वर, नाशिक रोड रिक्षा चालक मालक संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग नोंदविला.

नूतन वर्षाच्या प्रारंभी त्र्यंबकेश्वरला काही व्यक्ती थेट दर्शनासाठी हजारो रुपये उकळत असल्याचे एका वृत्त वाहिनीने प्रसिध्द केले. त्यामध्ये देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावरील एका सदस्याने दर्शनाचा काळा बाजार ऑटोरिक्षा चालक करत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. त्र्यंबकेश्वर मंदिरात थेट दर्शनासाठी जाताना त्याची रजिस्टरमध्ये नोंद होत असते. तसेच तेथे सीसीटीव्ही कॅमेरे असतात. ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी फुटेज तपासावे. तेथील गैरप्रकाराचे खापर रिक्षा चालकांवर फोडू नये. तसेच रिक्षा चालकांची बदनामी झाल्याने माफी मागावी, अशी मागणी केली.

मंदिर प्रवेशद्वारी आंदोलनास्थळी जात माजी नगराध्यक्ष सुरेश गंगापुत्र यांनी रिक्षा चालकांच्या भावना जाणून घेतल्या. मंदिर प्रवेशद्वारी आंदोलन सुरू असताना संघटनेच्या पाच सदस्यांनी देवस्थान ट्रस्टचे मुख्य अधिकारी अमित माचवे यांना निवेदन दिले. तसेच त्र्यंबक पोलीस ठाण्याला निवेदन दिले. या निवेदनावर त्र्यंबक रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष निलेश गांगोडे, उपाध्यक्ष विलास कोरडे, नाशिकरोड संघटनेचे अध्यक्ष विजय पवार, नसीम खाटिक यासह शेकडो रिक्षा चालकांच्या स्वाक्षरी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT