त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर मंदिरात शनिवारी (दि.16) रोजी सकाळी दहाच्या सुमारास शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी उत्तर दरवाजाने प्रवेश देऊन पश्चिम दरवाजाने बाहेर सोडण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेण्याच्या मुद्दावरुन भाविक आणि मंदिर ट्रस्ट कर्मचारी यांच्यात वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी पाच भाविकांना ताब्यात घेतले. भाविकांनी माफीनामा लिहून दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
मुख दर्शनासाठी खुला केलेला उत्तर दरवाजाचा अर्धा भाग दुपारी अडीचच्या सुमारास बंद करण्यात आला. त्यातच शनिवारी सकाळी २०० रूपये दर्शन सुविधाही बंद करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण दरवाजा बंद करण्यात आला. त्यावेळी बाहेर थांबलेल्या भाविकांचा एक जथा आक्रमक झाला. त्यांनी आम्हाला दर्शनासाठी प्रवेश देण्यासाठी घोषणाबाजी सुरु करत दरवाजा खुला करण्याची मागणी केली. आक्रमक झालेल्या या गटाने बॅरेकेटस हटवले व दरवाजावर धडका देण्यास सुरूवात केली. त्यामुळे गोधळाची स्थिती निर्माण झाली. मंदिर ट्रस्ट प्रशासनाचे अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवानांनी धाव घेऊन भाविकांच्या गटाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये चांगलीच झटापट झाली. भाविकांनी पाण्याच्या बाटल्या, चपलांनी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. कर्मचाऱ्यांनीसु्ध्दा भाविकांना यथेच्छ प्रसाद दिला. पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार सुरु होता. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत पाच भाविकांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. तेथे भाविकांना माफीनामा लिहून दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. या हाणामारीची चित्रफित समाजमाध्यमांवर झळकली.
गत काही दिवसांत दर्शनावरून दररोज वादाचे प्रसंग घडत आहे. त्यातही दर्शनाला सोडताना स्वतः ट्रस्ट प्रशासनाने केलेल्या नियमांची होणारी पायमल्ली नजरेस पडत आहे. त्यातून भाविक नाराज होत आहेत. आज या नाराजीचे हाणामारीत रुपांतर झाले.