Hospital Pudhari
नाशिक

Trimbakeshwar Hospital | त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय स्थलांतराचा फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने होमगार्डचा मृत्यू!

Trimbakeshwar Hospital | राज्य परिवहन मंडळाचाही असहकार, आंदोलक महिलांत फसवणुकीची भावना

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वरचे उपजिल्हा रुग्णालय तळवाडे येथे स्थलांतरित केल्याचे परिणाम आता दृष्टिक्षेपात येत आहेत. रुग्णांची उपचाराच्या अभावी हेळसांड होत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही अशा रुग्णांना प्रचंड अडचणीतून जावे लागत आहे. विशेष म्हणजे, एका गृहरक्षक दलाच्या जवानाला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याला जीव गमवावा लागला.

सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा देण्यासाठी बांधील असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बस देखील तळवाडे फाटा येथे थांबत नाहीत. हक्काच्या असलेल्या लाल बसने नकार दिल्यानेच गरजू रुग्ण हतबल होत आहेत.
त्र्यंबकेश्वरपासून पाच किलोमीटरवरील तळवाडे फाट्यापासून आतमध्ये २ किलोमीटरवर एका खाजगी संस्थेच्या इमारतीत रुग्णालय स्थलांतरित झाले आहे. तळवाडे फाटा येथे नाशिक त्र्यंबक फेऱ्या मारणाऱ्या बसला थांबा आहे. मात्र, येथे बस थांबवली जात नाही. नाशिक त्र्यंबक स्थानिक बस व्यतिरिक्त बाहेरच्या बसला थांबा नाही.

साहजिकच नाशिक त्र्यंबक रस्त्यावर धावणाऱ्या बस उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांसाठी आणि इतर कामकाजासाठी जाणारे, कर्मचारी यापैकी कोणाच्याही उपयोगाच्या नाहीत. तळवाडे फाटा ते रुग्णालय इमारत हे अंतर पायी जाताना रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची सत्वपरीक्षा पाहणारे आहे.

स्थलांतरित केलेल्या इमारतीत रुग्णालयाच्या सर्वसेवा उपलब्ध करताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. ग्रामीण भाग असल्याने दिवसा व रात्री बहुतांश कालावधीत वीज नसते. खाजगी संस्थेची ही इमारत ३ लाख रुपये महिन्याने भाडे तत्त्वावर घेतली आहे. लगतच्या जमिनीत पोल्ट्रीफार्म असल्याने येथे माशांचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे रुग्ण बरा होण्याऐवजी आणखी आजारी होत आहेत.

त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय आहे त्याच इमारतीत कार्यान्वित ठेवावे म्हणून नागरिकांनी आंदोलन केले. शहरातील आणि तालुक्यातील नेते मंडळींनी या आंदोलनाला समर्थन देत असल्याचे सांगत सहभाग नोंदवला. संतप्त महिलांनी घेराव घातला. गाव बंद ठेवण्याची भूमिका घेतली. त्यावेळी आठ दिवसात रुग्णालय येथे परत आणण्याचा शब्द स्थानिक प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी दिला.

तथापि, केवळ बाह्यरुग्ण विभाग म्हणजेच ओटीपी सुरू ठेवण्यात आली आहे. प्रत्यक्ष उपचारासाठी तळवाडे येथे जावे लागत आहे. १७ ऑगस्टला श्रावणातील पहिल्या सोमवारी गृहरक्षक दलाचा जवान बंदोबस्तावर असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. त्यास जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. रस्त्यांची दुरवस्था आणि वेळेचा अपव्ययमुळे जिल्हा रुग्णालयात पोहोचेपर्यंत तो जवान दगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT