त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरातील निसर्गस्थळांवर पावसाळ्यातील पहिलाच रविवार असल्याने पर्यटकांची उडालेली झुंबड रविवारी (दि. ५) पाहावयास मिळाली. तथापि तीन दिवसांपासून संततधार असलेल्या पावसाने नेमकी रविवारी विश्रांती घेतल्याने मनसोक्त भिजण्याच्या मूडमध्ये असलेल्या हौशी पर्यटकांचा हिरमोड झाला. पहिणेबारी परिसरात सकाळपासून शहरी पर्यटकांच्या वाहनांची रीघ लागली होती.
तथापि पाऊस नसल्याने सुप्रसिद्ध नेकलेस धबधबादेखील क्षीण झालेला दिसत होता. शाळा, महाविद्यालयांना प्रारंभ झालेला आहे. साहजिकच रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी तरुणाईची संख्या अधिक आहे. तथापि पहिणेबारी परिसरात सुरक्षित पर्यटन म्हणून कुटुंबासह आलेले शहरी पर्यटक दिसून येत होते.
अद्याप विशेष जोर नसलेल्या नदी प्रवाहात सोबतच्या लहान मुलांना घेऊन जलक्रीडेचा आनंद घेताना पर्यटक आढळत होते. पहिणेबारी परिसरात भाजलेले मक्याचे कणीस आणि मॅगी यांची दुकाने थाटली आहेत. वाढत्या महागाईची झळ या खाद्यपदार्थांनाही बसली आहे. स्थानिक वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पहिणे नेकलेस धबधबा येथे प्रवेशशुल्क आकारण्यात येते.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ४०० पर्यटकांनी, तर रविवारी ८०० पर्यटकांनी अधिकृत प्रवेशशुल्क पास घेऊन धबधबा परिसरात निसर्ग पर्यटनाचा आनंद घेतला. प्रत्यक्षात पहिणेबारी परिसरात दहा हजारांच्या दरम्यान पर्यटक आले असावेत, असा अंदाज स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केला. हरिहर किल्ल्यावर ३०० पर्यटकांना सोडल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. दुपारनंतर पहिणे नेकलेस धबधबा, दुगारवाडी धबधबा, हरिहर किल्ला या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला होता
पायबंद घालण्याची मागणी
सायंकाळनंतर नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर तसेच पेगलवाडी फाटा येथे वाहतूक कोंडी अनुभवास आली. पर्यटकांच्या वाहनांची दाटी झाल्याने जागोजागी कोंडीची परिस्थिती होती. दिवसभर पहिणे रस्त्याने दुचाकीवर धूम करणारे, तसेच मद्यपान करणारे पर्यटक आढळून येत होते. कुटुंबासह आलेल्या पर्यटकांची त्यामुळे कुचंबणा झाली. पेगलवाडी परिसरात त्र्यंबक पोलिस आणि तेथून पुढे पहिणे भागात वाडीव-हे पोलिस यांनी सतर्क राहून अपप्रवृत्तींना आळा घालण्याचे आणि टारगटपणाला पायबंद घालण्याची मागणी होत आहे.