Trimbakeshwar Bus Stand  
नाशिक

Trimbakeshwar Bus Stand | सांगा, आम्ही शाळा अन् घर कसं गाठायचं?

Trimbakeshwar Bus Stand | त्र्यंबकेश्वरमध्ये राज्य परिवहन महामंडळाचा बेफिकीर कारभार

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
येथील बसस्थानकातील बससेवा बेभरवशाची झाली आहे. सलग तास दोन तास बस न येणे, ठराविक मार्गांवरील बसफेरी रद्द होणे, याचा फटका ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना बसत आहे. ग्रामीण भागातील बस लवकर जात असल्याने दुपार सत्राच्या शाळेतील मुलींना मधल्या सुट्टीनंतर शेवटच्या दोन तासिका सोडून बसस्थानकावर धाव घ्यावी लागते. यामुळे मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

त्यामुळे या मुलींना शाळा आणि घर गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
मानव विकासाची शालेय विद्यार्थ्यांसाठी एखाद दुसरी बस आली तर आली. तिच्यातही इतर प्रवासी गर्दी करतात. मुलींना गर्दीत घुसावे लागते. त्यात बसस्थानकावर येऊन तास दोन तास बसची प्रतीक्षा करावी लागते.

बसस्थानकावर सीसीटीव्ही नाही, सुरक्षा नाही, चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यात रोडरोमिओ दुचाकी घेऊन बेफामपणे रायडिंग करतात. त्यामुळे मुलींना येथे थांबणे धोकादायक झाले आहे. येथे पोलीस नसल्याने गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे फावले आहे. गर्दीचा फायदा घेत चोरटे सोनसाखळ्या आणि पाकीटमारी करत आहेत. याबाबत कारवाईची मागणी होत आहे.

गर्दी असूनही पुरेशा प्रमाणात बस सोडण्यात येत नसल्याचा आरोप होत आहे. नाशिकव्यतिरिक्त इतर आगाराच्या बस नाशिक - त्र्यंबक प्रवाशांना घेत नाहीत. नाशिक ठक्कर बाजार स्थानकावरही असाच अनुभव येत असल्याचे विद्यार्थी सांगतात.

सौजन्याची ऐशीतैशी

त्र्यंबकेश्वर येथे पूजाविधीसाठी आलेले परप्रांतीय प्रवासी येथे दादागिरी करतात. एखाददुसरा प्रवासी दमदाटी करीत बसमध्ये प्रवेश मिळवितो आणि सर्व आसनांवर पिशव्या वा इतर साहित्य ठेवून त्यांच्या सोबत असतील त्यांनाच बसण्यास जागा देतात. इतरांना मात्र उभे राहण्याची वेळ येते. दिव्यांग, वृद्ध, महिला यांना बसण्यास जागा देत नाहीत. दुपारी परतीच्या प्रवासात हा अनुभव हमखास येतो. याबाबत वाहकाकडे विनंती केल्यास ते धुडकावून लावतात. याबाबत स्थानकाचे नियंत्रकही हतबलता व्यक्त करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT