Trimbakeshwar Ganga Slab 
नाशिक

Trimbakeshwar Ganga Slab | त्र्यंबकला गंगेवरील स्लॅब तोडण्यास रात्रीचा मुहूर्त

Trimbakeshwar Ganga Slab | त्र्यंबकला गंगेवरील स्लॅब तोडण्यास रात्रीचा मुहूर्त; पुरातत्त्व विभागाच्या हस्तक्षेपाने वाद

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर (पुढारी वृत्तसेवा):

त्र्यंबकेश्वर येथील बहुप्रतीक्षित ठरलेला मेनरोड गंगा स्लॅब तोडण्यास शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रारंभ करण्यात आला. गायत्री मंदिर आणि लक्ष्मीनारायण चौक येथील तोडफोडीचे काम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या हस्तक्षेपाने थांबले होते.

यावर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या ठेकेदाराने सुवर्णमध्य काढत कुशावर्त घाटापासून जवळच असलेल्या सत्यनारायण मंदिर परिसरात स्लॅब तोडण्याचे काम हाती घेतले, ज्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, शनिवारी सकाळी पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे काही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मंदिरापासून ३०० मीटरच्या आत सुरू असलेले काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले.

वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय काम सुरू ठेवू नका, अशी तंबी त्यांनी दिली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी "अर्धवट काम करून खोळंबा केला" असे म्हणत नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांच्या मध्यस्थीनंतर आणि पाठपुराव्यामुळे पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली.

पुरातत्त्व विभागाचा उलटा कारभार

या संपूर्ण कामात सरकारच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत असून त्यामुळे कामाची गती मंदावली आहे. एकीकडे संपूर्ण प्रशासनाला आगामी कुंभमेळा यशस्वी करायचा आहे, तर दुसरीकडे शासकीय विभागच एकमेकांकडे कागदपत्रांची मागणी करत वरिष्ठांची भीती दाखवत आहेत. या अनागोंदी कारभाराकडे कुंभमेल्याच्या सुकाणू समितीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT