License Suspension Pudhari
नाशिक

Fertilizer Shop License | त्र्यंबकेश्वरमध्ये कृषी विभागाचा मोठा दणका; मुंडा कृषी सेवा केंद्राचा खतविक्री परवाना 15 दिवसांसाठी निलंबित!

Fertilizer Shop License | शेतकरी रामभाऊ मुळाणे यांच्या तक्रारीची दखल

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
शहरातील खत विक्री करणारे परवानाधारक दुकानदार मे. माणिकलाल रामविलास मुंडा यांचा खतविक्री परवाना जिल्हा कृषी अधिकारी नाशिक यांनी निलंबित केला. प्रगतीशील शेतकरी रामभाऊ मुळाणे यांनी मागील महिन्यात दोन गोण्या खत विकत घेण्यासाठी मुंडा यांच्या दुकानात गेले असता, त्यांना तेथे खत ठेवलेले असूनही ते विकत देण्यास नकार देण्यात आला. तसेच खताची विक्री किंमत जास्त असल्याचे निदर्शनास आले म्हणून त्यांनी याबाबतची तक्रार संबंधित विभागाकडे केली होती.

दुकानदाराचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित करावा लागल्यामुळे तालुक्यात शेतकरी वर्गात चर्चा होत आहे. तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी यांनी खत विक्री दुकानदार खत नाकारणे तसेच अवाजवी पैसे घेणे याबाबत लेखी तक्रार कृषी अधिकारी यांच्याकडे केली होती. याची गंभीर दखल घेऊन खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी गुणवत्ता निरीक्षक यांनी विक्रेत्याच्या दुकान आणि गोदामाची तपासणी केली असता, खत (नियंत्रण) आदेश - १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील तरतुदींचे गंभीर उल्लंघन केल्याचे आढळले होते.

परवानाधारक खत विक्रेते मुंडा यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली, परंतु त्यांनी कुठलाही खुलासा सादर केला नाही. त्यानंतर परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला व सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी मुंडा यांनी केलेला खुलासा अमान्य करण्यात आला.

तपासणीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बिलावर स्वाक्षरी न घेणे, खतसाठा भावफलक दर्शनी भागास न लावणे, खतसाठा रजिस्टर एम फॉर्ममध्ये ठेवलेला नसणे, विक्रीबिलात आवश्यक मजकूर नाही, साठा रजिस्टरमध्ये नोंदविलेल्या शिल्लक खतसाठा व प्रत्यक्षात शिल्लक साठा जुळत नाही.
रासायनिक खत विक्रीचा मासिक प्रगति अहवाल सादर केलेला नाही, नोंदणी प्रमाणपत्र समावेश केलेला नाही. विक्री करीत असलेल्या रासायनिक खताची खरेदी बिले ठेवली नाहीत. याची दखल घेऊन दि. ३ ते १७ सप्टेंबर खतविक्री परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये परवाना निलंबित झाल्याच्या दिनांकापासून कोणत्याही प्रकारच्या खत खरेदी - विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT