गिरीश महाजन  file photo
नाशिक

Girish Mahajan : भक्ताला मारहाण प्रकरणी तातडीने कठाेर कारवाई करा

त्र्यंबकेश्वरमधील प्रकार : मंत्री महाजन यांनी केल्या पोलिसांना सूचना

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रस्थळी भाविकाला झालेली मारहाण ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, संबंधितांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी दोषींना धडा शिकवावा, अशा सूचना दिल्या असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

मंत्री महाजन म्हणाले की, मंदिरात भक्ताला मारहाण करण्याची घटना माझ्या मनाला पटलेली नाही. त्या भक्ताने नशा केली असल्याचे सुरक्षारक्षक कसे ठरवतात. असा प्रश्न उपस्थित करीत विषय गंभीर आहे. संबंधित दोषींवर गुन्हा दाखल व्हायलाच हवा, अशी माझी भूमिका आहे. जगभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये येतात. वारंवार असे प्रकार होणे चुकीचे असून, ज्यांनी हा प्रकार केला, त्या पोलिसांनी धडा शिकवावा, असे निर्देशही दिले असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. दरम्यान तेथील देवस्थान समितीची बैठक बोलावून याबाबत योग्य नियोजन करीत निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

स्वीकृत सदस्यांची नावे लवकरच

मनपा स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपतर्फे इच्छुकांची गर्दी मोठी आहे. याबाबत योग्य निर्णय घेत दोन दिवसांत नावे जाहीर करू. महापालिका सभागृहातील अन्य नियुक्त्याही आठवडाभरात करू, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

दोन-तीन दिवसांत परिस्थिती निवळेल

आखाती देशातील युद्धामुळे महाराष्ट्रातील बहुतेक नागरिक व विद्यार्थी अडकले आहेत. केंद्र व राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. घाबरण्याचे कारण नाही. दुबईहून सतत फोन येत आहेत. दूतावासाशी संपर्क सुरू आहे. नगर, धुळे, जळगाव, पुणे येथील लोक आहेत. सध्या विमानसेवा बंद असल्यामुळे ते अडकले आहेत. काही अडचणी होत्या. बुकिंग संपले होते. काहींकडे पैसे नाहीत. असेही काही लोकांनी सांगितले. दोन ते तीन दिवसांत स्पेशल विमानसेवा सुरू होईल. परिस्थितीही निवळेल, असे महाजन यांनी सांगितले.

उन्मेश पाटीलची पक्षातून हकालपट्टी...

माजी खासदार उन्मेश पाटील शिवसेना ठाकरे गटातून आता शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेबाबत मंत्री महाजन म्हणाले की, उन्मेश पाटील यांना आम्ही पक्षातून हाकलले आहे. त्यामुळे कुठेही जाऊ द्या, ते अजून बरेच पक्ष फिरतील, अशी टीका केली. पक्ष सोडल्यावर काय होईल हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना कुठेही जाऊ द्या त्यांना परिस्थिती समजेल, असा टोला त्यांनी लगावला.

संजय राऊतांनी तारतम्याने बोलावे

शिवसेनेचे नेते संजय राऊत तिकडे जाऊन लढू शकतात. त्यांनी तारतम्य ठेवून बोलावे. तिसरे महायुद्ध सुरू होईल, अशी स्थिती आहे. त्यांच्या बुद्धीची कीव येते.

सुरक्षा रक्षकांविरुद्ध गुन्हा

त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून कपडे फाडत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण झाल्याची घटना रविवारी (दि. 1) व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर आली होती. हा संपूर्ण प्रकार मंदिरातील एका भाविकाने मोबाइलमध्ये कैद केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त होत असल्याने या प्रकरणी त्र्यंबक पोलिसांनी स्वत:हून दखल घेत संबधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सलग सट्यांमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. हरियाणा येथील भाविक दर्शनासाठी आला होता. काही कारणावरून सुरक्षारक्षक आणि त्याच्यात वाद होऊन झटापट झाली. यावेळी त्याला मंदिरातील सुरक्षारक्षकांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसले होते. या घटनाक्रमामुळे मंदिरातील सुरक्षा रक्षकांची दादागिरी पुन्हा चर्चेत आली होती.

दरम्यान, या घटनेनंतर ज्या भाविकाला मारहाण झाली होती, त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने पोलिस शिपाई अमोल गोविंद बोराडे (39) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलिसांनी मंदिरातील सुरक्षारक्षक पप्पू नानाजी आचारी (रा. इंदिरानगर, त्र्यंबकेश्वर), तुकाराम उमेश बुरुंगे (रा. त्र्यंबकेश्वर) यांच्यासह इतर 3 ते 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक राजेश देवरे अधिक तपास करीत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांकडून होते चौकशीचे आदेश

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना दर्शनासाठी पाच ते सहा तास लागतात. दर्शनाची वेळ संपल्यावर चार ते पाच हजार भाविकांना दर्शन न घेता परतावे लागते. जे दर्शन रांगेत असतात, त्यांना सुरक्षारक्षकांचा जाच सहन करावा लागतो. भाविकाला मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT