त्र्यंबकेश्वर : देवयानी डोंगर
श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारच्या फेरीला रविवारी (दि. ३०) सायंकाळापासून भाविकांनी सुरुवात केली. रात्रीच्या अंधारात ब्रह्मगिरीच्या कडेकपारीत 'हर हर महादेव'चा घोष होत होता. त्र्यंबकेश्वर शहरात पायी जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. कुशावर्तावर पोहोचण्यासाठी आणि तिथून प्रदक्षिणा मार्गावर रवाना होण्यासाठी बॅरिकेडिंग करीत रहदारीचे नियंत्रण करण्यात आले आहे.
श्रावणाच्या पहिल्या शनिवारी स्वातंत्र दिनाची सुटी आल्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे अचानक झालेल्या गर्दीने प्रशासन यंत्रणा सावध झाली. शनिवार, रविवार आणि सोमवारी खंबाळे पार्किंग सक्तीचे करण्यात आले आहे. रविवारी त्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली.
रहिवासी नागरिकांच्या वाहनांना प्रवेश पास देताना त्यात तिसरा शनिवार, रविवार आणि सोमवार वगळण्यात आले होते. खंबाळे वाहनतळावर रविवार सकाळपासून वाहनांची दाटी झाली होती. तळेगाव फाटा येथे वाहनांना अडवण्यात येऊन वाहनतळाकडे पाठविले जात होते. तिथून त्र्यंबकेश्वरपर्यंत एसटी बसने प्रवास सुरू होता. रविवारी दुपारपासून भाविकांचा ओघ वाढलेला दिसला.
प्रदक्षिणेला जाताना पेगलवाडी फाटा येथे असलेल्या प्रयागतीर्थावर भाविक प्रदक्षिणा घालतात. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तलाव संवर्धनाचे काम सुरू आहे. तलावाची खोली वाढलेली आहे. पर्यायाने पाणीसाठा वाढलेला आहे.
गतवर्षी तिसऱ्या सोमवारच्या दरम्यान या तलावात पडल्याने भाविकाचा मृत्यू झाला होता. यावर्षी तिथे सुरू असलेल्या विकासकामामुळे भाविकांचा अपघात होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तलावाकडे जाणारे रस्ते बॅरिकेडिंगने बंद केले आहेत.
प्रदक्षिणेतील प्रत्येक पाऊल हे शिवभक्तीच्या दिशेने टाकलेले पाऊल मानले जाते. शिवलिंगाचे दर्शन, कुशावर्त तीर्थाचे महत्त्व आणि ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा यामुळे त्र्यंबकेश्वर यात्रा अधिक अर्थपूर्ण होते.
तिसरा श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवाला बेलपत्र, जल, दूध, पंचामृत आणि फुले अर्पण करून अभिषेक केला जातो. 'महामृत्युंजय मंत्र' किंवा 'ॐ नमः शिवाय'चा जप करणेही भक्तिपूर्ण साधना मानली जाते. आजची शिवमूठ मूग असल्याने सौभाग्यवतींनी शिवाला शिवमूठ अर्पण करून पूजन करावे, असे संकेत आहेत.