नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी शनिवारी (दि. ३१) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील अनेक मंत्री नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर व्हीआयपी मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने तातडीने रस्ते दुरुस्ती मोहीम हाती घेतली आहे. मात्र, सिंहस्थासाठी काँक्रितीकरण सुरू असलेल्या त्र्यंबक रोडवरही डांबरीकरण केले जात असल्याने या खर्चाच्या औचित्याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
खडककाळी सिग्नल ते पिंपळगाव बहुला हद्दीपर्यंत सुमारे १७५ कोटी रुपये खर्चून त्र्यंबक रोडचे काँक्रितीकरण करण्यात येत आहे. असे असतानाही राष्ट्रपतींचा ताफा जाणार असल्याने या मार्गावर डांबरी पॅच टाकले जात आहेत. काँक्रितीकरण होणाऱ्या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात डांबर टाकण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत होत आहे.
३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती रामकुंड येथे ध्वजारोहण केल्यानंतर त्र्यंबकेश्वरला जाणार आहेत. त्यानंतर पोलिस अकादमीत विश्रांती घेऊन सायंकाळी गोदाकाठावरील गोदा आरतीला उपस्थित राहणार आहेत.
या दौऱ्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ, जयकुमार रावल, डॉ. अशोक उईके आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. व्हीआयपींच्या प्रवासात अडथळे येऊ नयेत, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. हवामानातील बदलामुळे राष्ट्रपतींचा त्र्यंबकेश्वर दौरा रस्तेमार्गे होणार असल्याने रस्ते दुरुस्तीला वेग देण्यात आला आहे.
खड्डे दुरुस्तीसाठीचा खर्च सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या निधीतून केला जात आहे. व्हीआयपी मार्गावरील दुरुस्ती सिंहस्थाची कामे करणाऱ्या ठेकेदारांकडूनच करून घेतली जात आहे. त्र्यंबक रोडवर व्हाईट टॉपिंग होणार असल्याने त्यापूर्वी डांबरी पॅच तयार केले जात आहेत.— संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका