त्र्यंबकेश्वर (नाशिक) : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुकवार (दि.१४) २१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यात तीन उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दिले आहेत. यात सुरेश माधवराव गंगापुत्र (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), किरण लहु चौधरी (आम आदमी पार्टी) आणि दिलीप मनोहर पवार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांचा समावेश आहे. सुरेश गंगापुत्र यांचा उमदेवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भाजप नगराध्यक्षपदासाठी कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता लागली आहे. त्र्यंबकेश्वर नगरपरिषद मध्ये नगराध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव आहे. भाजपकडे १०० इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यात नगराध्यक्ष पदासाठी ८ उमेदवार इच्छुक आहेत. अर्ज दाखल करताना बहुतेक उमेदवारांनी आपल्या अर्जावर भाजपचा प्राधान्याने उल्लेख केलेला दिसत आहे. तथापि, काहींनी पक्षाचा एबी फार्म मिळाला नाही तर पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस व ते नाही मिळाले तर अपक्ष अशी तयारी केली आहे. सोमवारी (दि.17) रोजी तीनपर्यंत एबी फॉर्म द्यावा लागणार आहे. त्या विवंचनेत भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहे.
राष्ट्रवादी आणि शिंदे गटात युती
त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने युती असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीत फूट पडली आहे. भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे यातून दिसून येत आहे. कमळ चिन्हावर निवडणूक लढवणारे यामुळे उत्साहित झाले आहेत.