चांदवड (नाशिक) : सुनील थोरे
दीर्घकाळापासून रखडलेल्या चांदवड ट्रॉमा केअर केंद्रातील मॉड्युलर आयसीयूला तांत्रिक मान्यता मिळाल्यामुळे गंभीर व अपघातग्रस्त रुग्णांना तत्काळ उपचार देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे चांदवडमध्ये तातडीने उपचार मिळत नसल्याने होणारी गैरसोय, धावपळ कमी होऊन अपघातग्रस्तांचे जीव वाचण्यास मदत होणार आहे.
चांदवड शहरातून मुंबई आग्रा महामार्ग, चांदवड - मनमाड, प्रकाशा -विंचूर हे महामार्ग गेले आहे. वाहनांच्या कायम रहदारीमुळे वारंवार अपघात होतात. अपघातातील जखमींवर 'शून्यअवर्स' मध्ये उपचार झाल्यास अपघातग्रस्तांचे प्राण वाचतात. या दृष्टीने चांदवडला २०१३ - १४ मध्ये दुमजली ट्रामा केअर सेंटरची इमारत बांधण्यात आली.
मात्र, इमारतीत आवश्यक असलेले पदे, साधनसामग्री गेल्या १० ते १२ वर्षापासून धूळखात पडले होते. या कालावधीत चांदवड शहर व तालुक्यात शेकडो अपघात झाले. त्यात अनेकांना प्राण गेले. काहीना कायमचे अपंगत्व आल्याचे वास्तव आहे. ट्रामा केअर सुर होण्यासाठी प्रहार जनशक्तीचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांनी अनेक आंदोलने केली. शासनाकडे पाठपुरावा केल्याने ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्याने निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. अत्यावश्यक मॉड्युलरला तांत्रिक मान्यता मंजूर झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांना आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने उपचार देता येणार आहे.
अनेक वर्षापासून ट्रामा केअर सुरू करण्याची अपेक्षा खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जात आहे. यामुळे आनंद होत आहे. ट्रामा केअर सेंटरमध्ये अपघातग्रस्तांना उपचार तत्काळ मिळणार असल्याने नागरिकांचे जीव वाचणार आहे. शासनाने ट्रामा सेंटर सुरू न करता डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करावे.गणेश निंबाळकर, जिल्हाप्रमुख, प्रहार
ट्रामा केअरमध्ये या आहेत सुविधा
ट्रामा सेंटरमध्ये अत्याधुनिक लाइफ सपोर्ट सिस्टीम, त्वरित उपचारासाठी आवश्यक मॉनिटरिंग यंत्रणा, स्वच्छ व सुरक्षित वातावरण, अनुभवी डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध होणार आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांचे जीव वाचण्याची शक्यता वाढणार आहे. यापूर्वी अपघातग्रस्तांना नाशिक किंवा इतर ठिकाणी न्यावे लागत होते.
ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी आवश्यक असणारी पदे व साधनसामग्री उपलब्ध झाली आहे. मॉड्युलर आयसीयूसाठी मुंबईतील नायडस कंपनीस शासनाने परवानगी दिली आहे. लवकरच ट्रामा केअर सेंटर सुरू होणार आहे.डॉ. नवनाथ आव्हाड, वैद्यकीय अधीक्षक, चांदवड.