नाशिक : शहरातील वाहनांसाठी पुरेशी वाहनस्थळे उपलब्ध नसतानाही नव्याने टाेइंग ठेकेदार नेमून शहर वाहतूक शाखेने टोइंग कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.६) टोइंग व्हॅन द्वारे पहिल्या दिवशी २१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करुन नऊ हजार ७२० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पहिल्या दिवशी पुर्वसुचना देण्यावर टोइंग व्हॅनवरील पोलिसांचा भर दिसला.
युनिट दाेन हद्दीत गुरुवारी (दि.6) रोजी झालेल्या टाेइंग केसेस
दुचाकी - १८ ; दंड शुल्क - ८,७४८ रुपये
चारचाकी - ३ ; दंड शुल्क - ९७२
एकूण कारवाया- २१ ; एकूण दंड आकारणी- ९, ७२० रुपये
बेशिस्त वाहन चालकांवर वेसन घालण्यासाठी पोलिसांनी टोइंग कारवाईस सुरुवात केली आहे. बुधवारी (दि.५) पहिल्या दिवशी टोइंग कारवाईचा मुहूर्त लागला नाही. मात्र गुरुवारी (दि.६) टोईंग व्हॅन मार्फत कारवाई सुरु झाली. वाहतूक पोलिसांनी पुर्वसुचना देत नो पार्किंग मधील वाहने काढण्याचे आवाहन केले. शहरातील भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका व गंगापूर पोलिसांच्या हद्दीत टोइंग करण्यास सुरुवात झाली आहे. त्यापाठोपाठ बऱ्याच वर्षानंतर नाशिकरोड, उपनगर व देवळाली कॅम्प पोलिसांच्या हद्दीतही टोइंग होणार आहे. त्याचीही सुरुवात येत्या एक दाेन दिवसांत हाेणार असून नागरिकांच्या सुविधेसाठी जेथून वाहने उचलण्यात येतील, त्याच भागात जमा होणार आहेत. टोइंग कारवाई पुन्हा सुरू झाल्याने बेशिस्त वाहतूक व पार्किंगच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी करारातील नमूद अटी-शर्तींसह दरानुसार टोइंगच्या दाेन कंत्राटाला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार, ६ मार्चपासून सरकारवाडा विभागात पुन्हा टोइंग कारवाई सुरु झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे. रस्त्यावर बेशिस्तरित्या वाहने उभी करु नयेत. अन्यथा, वाहने टोइंग करुन दंड आकारला जाईल, असे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. वाहतूक विभागाने महापालिकेस वाहनतळांची फलक लावण्याची सूचना केली आहे.