'Top gear' of automobile sector during Diwali
नाशिक : सतीश डोंगरे
दसरा-दिवाळीचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑक्टोबरमध्ये ऑटोमोबाइल क्षेत्र तेजीच्या शिखरावर असते. यंदा 'जीएसटी' दर कमी केल्याने, पुढील महिन्यात ऑटोमोबाइल क्षेत्र 'टॉप गिअर' टाकण्याचा अंदाज आहे. २०२४ मध्ये २०२३ च्या तुलनेत ११.७ टक्के वाहन विक्रीत वाढ नोंदविली गेली. यंदा ही वाढ ३० टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी शुभ मानली जात असल्याने, या काळात वाहन क्षेत्रात मोठी उलाढाल होत असते. यंदा वाहनांवर आकारला जाणारा २८ टक्के जीएसटी १८ टक्के करण्यात आल्याने, वाहन खरेदीचे स्वप्न अनेकांकडून पूर्ण केले जाणार आहे. गेल्या ऑक्टोबर २०२४ चा विचार केल्यास, या महिन्यात सर्व विभागांमधील वाहनांची देशांतर्गत विक्री २५ लाख ८६ हजार १५७युनिट्स इतकी होती.
ऑक्टोबर २०२३ मध्ये हा आकडा २३ लाख १४ हजार ६०१ युनिट्स इतका होता. या वर्षात ११.७टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत ऑक्टोबर २०२४ मध्ये चार लाख ५४ हजार ५४ युनिट्सची निर्यातही केली गेली. जी २०२३ मध्ये याच कालावधीत तीन लाख ७१ हजार ३० युनिट होती. निर्यातीतदेखील २२.४ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. तसेच वाहनांच्या उत्पादनातही १० टक्क्यांची वाढ होऊन ऑक्टोबर २०२३ च्या २६ लाख २१ हजार ६६० युनिट्सच्या तुलनेत ऑक्टोबर २०२४ मध्ये २८ लाख २८ हजार ९९६ युनिट्स होती.
यंदा या सर्व आकड्यांमध्ये मोठा फेरबदल होणार आहे. २२ सप्टेंबरपासून जीएसटीचे नवे दर लागू झाल्यापासूनच वाहन बाजारात बुकिंगचा धडाका सुरू आहे. याशिवाय ऑटोमोबाइल कंपन्यांकडून देखील उत्पादन वाढविले आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ऑक्टोबर महिन्यात सर्व विभागातील ३० लाखांपेक्षा अधिक युनिट्स वाहनांचे उत्पादन केले जाणार असून, तेवढ्याच प्रमाणात वाहन विक्री होणार आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये दुचाकींची १८.९६ लाख युनिट्स विक्री. २०२४ मध्ये २१ लाख ६४ हजार २७६ युनिट्स इतकी विक्री. १४.२ टक्के वाढ.
ऑक्टोबर २०२४ मध्ये तीन चाकी वाहनांनी ०.७ टक्क्यांनी घट नोंदविली. मालवाहू वाहनांच्या विक्रीत १ टक्क्यांनी घट. ई-रिक्षाच्या देशांतर्गत विक्रीत ४९.४ टक्क्यांनी घट.
ऑक्टोबर २०२४ मध्ये सेडान कारच्या दोन हजार ३५१ युनिट्सची विक्री. ऑक्टोबर २०२३ मध्ये ही संख्या एक हजार ७७२ युनिट्स इतकी होती.
जीएसटी दर कमी केल्याने, दसरा, दिवाळीत वाहन विक्री समाधानकारक होण्याचा अंदाज आहे. मात्र, देशभरात पावसाने धुमाकुळ घातल्याने, ओला दुष्काळसदृश्य स्थिती असल्याने, त्याचा फटका बसण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.- जितेंद्र शहा, व्यवस्थापकीय संचालक, जितेंद्र मोटर्स
ऑक्टोबर २०२४ मध्ये एसयूव्ही कारला अधिक पसंती दिली गेली. सर्व आघाडीच्या ऑटोमोबाइल कंपन्यांनी एकापेक्षा एक अशा एसयूव्ही कार बाजारात उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात तब्बल दोन लाख २१ हजार १४५ एसयूव्ही कारची विक्री झाली. यंदा अत्याधुनिक फिचर असलेल्या एसयूव्ही बाजारात उपलब्ध करून दिल्याने, गतवर्षीच्या तुलनेत एसयूव्ही विक्रीचा विक्रम नोंदविला जाण्याचा अंदाज आहे.
वाहन विक्री
२०२३ : 23,14,601
२०२४ : 25,86,157
२०२३ : 3,71,030
२०२४ : 4,54,054
२०२३ : 26,21,660
२०२४ : 28,28,996
२०२४ : 3,93,238
२०२४ : 2,25,934