कसबे वणी : पुढारी वृत्तसेवा
सणासुदीच्या काळात टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा बाळणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ, पावसाची ओढ आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या २० किलोच्या टोमॅटो क्रेटसला अवघे १०० ते १२० रुपये मिळत असून, दोन दिवसांपूर्वी हाच दर ५० ते ६० रुपये होता. म्हणजेच प्रतिकिलो दर केवळ ५ ते ६ रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
वणी व दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांची अर्थव्यवस्था टोमॅटो पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे बाजारभावातील घसरणीचा परिणाम शेतकऱ्यांसह व्यापारी, वाहतूकदार, हमाल आणि शेतमजुरांवरही होत आहे. पूर्वी ४० ते ५० पैशांना मिळणारी साधी रोपे अपेक्षित प्रमाणात टिकत नसल्याने आता वांग्याच्या खुंटावर तयार केलेल्या ग्राफ्टिंग रोपांचा वापर वाढला आहे. मात्र, या रोपांची किंमत ८ ते ९ रुपये असल्याने लागवड खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात खते आणि औषधांच्या वाढत्या किंमतीची भर पडत आहे.
टोमॅटोचे उत्पादन आणि बाजारभाव यावर परिसरातील आर्थिक उलाढाल अवलंबून आहे. भाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा कमी येत असून त्याचा परिणाम स्थानिक व्यापार, वाहतूक आणि मजुरीवरही होत आहे. त्यामुळे शासनाने कृषी व महसूल विभागामार्फत गावनिहाय पीक परिस्थिती आणि पर्जन्यमानाची संयुक्त पाहणी करून दुष्काळसदृश स्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे व नियमानुसार मदतीसाठी कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.