Tomato prices 
नाशिक

Tomato prices- टोमॅटो फक्त 100 रुपये क्रेट

क्रेटमागे उरतात अवघे २५ ते ४५ रुपये, शेतकरी हवालदिल

पुढारी वृत्तसेवा

देवगाव : नाशिक जिल्ह्यात टोमॅटोच्या बाजारभावाचा प्रश्न गंभीर झाला असून, २० किलोच्या क्रेटला अवघे ८० ते १०० रुपये मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे टोमॅटो उत्पादनाचा खर्च बाजूला ठेवला, तरी केवळ तोडणी आणि वाहतुकीसाठी क्रेटमागे ५५ रुपये खर्च येतो. त्यामुळे विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून हा खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात अवघे २५ ते ४५ रुपये म्हणजे किलोमागे २ रुपये उरतात.

या हिशेबात टोमॅटो लागवडीसाठी केलेला खर्च, खते, औषधे, फवारणी, पाणी, मजुरी आणि इतर खर्च धरलेलाच नाही. केवळ माल तोडून बाजार समितीपर्यंत पोहोचविण्यासाठी होणारा खर्च वजा केल्यानंतर ही रक्कम उरते. त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादन खर्चाचा विचार केल्यास, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे चित्र अधिक गंभीर होऊ शकते. टोमॅटो काढणीला आला की, तो शेतात जास्त काळ ठेवता येत नाही. माल खराब होण्याचा धोका असल्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात विक्री करावी लागते. मात्र क्रेटमागे ५५ रुपये तोडणी आणि वाहतुकीवर खर्च होत असताना, ८० ते १०० रुपयांचा विक्रीभाव शेतकऱ्यांना दिलासादायक ठरत नाही.

एकीकडे बाजारात टोमॅटोचा भाव ८० ते १०० रुपये क्रेट, तर दुसरीकडे तोडणी आणि वाहतुकीसाठीच ५५ रुपये खर्च अशा परिस्थितीत टोमॅटो विकून शेतकऱ्यांच्या हातात नेमके उरते तरी काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. टोमॅटोचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

हजारो रुपये खर्चुन पिकविलेल्या टोमॅटोला आज अवघा दोन रुपये किलो भाव मिळत असल्यामुळे उत्पादन खर्च तर दूरच, वाहतूक आणि तोडणीचा खर्चही परवडेनासा झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी न करता, पीक शेतातच सोडून दिले आहे. नवरात्रोत्सवात सीमा बंद असल्यामुळे निर्यातीवर परिणाम झाला आणि त्यामुळे भाव पडले, असा शेतकऱ्यांचा समज होता. मात्र, नवरात्र संपल्यानंतरही टोमॅटो दरात सुधारणा होण्याऐवजी भाव अधिकच घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

शेतकऱ्यांनी पिकवायचे, खर्च करायचा आणि शेवटी आपलाच माल मातीमोल भावात विकायचा, तर शासन नेमके करते तरी काय, शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून टोमॅटोला रास्त भाव मिळवून द्यावा, नुकसानभरपाई द्यावी आणि निर्यातीसह पर्यायी बाजारपेठांची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

शासनाकडून ठोस उपाययोजना हवी

एकीकडे दुष्काळसदृश परिस्थिती, वाढता उत्पादन खर्च, महागडी खते - बियाणे आणि मजुरीचा बोजा, तर दुसरीकडे शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. यावर्षीच्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.

राज्यात सगळीकडे दुष्काळाचे सावट

असताना टोमॅटोला योग्य दर मिळत नाही. शासनाने टोमॅटो दराबाबत ठोस निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. केंद्राने निर्यात धोरणात सुसूत्रता आणावी.

- लक्ष्मण कातड, टोमॅटो उत्पादक, मातोरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT