पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीत टोमॅटोला सरासरी तेराशे रुपये प्रति क्रेट बाजारभाव मिळत असून रोज तब्बल वीस कोटीची उलाढाल होत आहे. त्यामुळे टोमॅटोची लाली चांगलीच वाढली आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत टोमॅटोचे बाजारभाव पडले होते. परंतु, झालेला विक्रमी पाऊस, त्यामुळे टोमॅटोवर वाढलेला रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन घेटले. त्यामुळे देशांतर्गतसह बांगलादेश व आखाती देशांमध्ये पिंपळगाव बसवंतच्या टोमॅटोला मोठी मागणी वाढल्याने दरात तेजी आली आहे. शनिवारी (दि. ५) प्रति क्रेट दर १२०० रुपयांपर्यंत होते, त्यात रविवारी (दि. ६) शंभर रुपयांची वाढ होऊन प्रति क्रेटचा दर सरासरी १३०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
भारतासह बांग्लादेशला टोमॅटोचा पुरवठा करण्याची भिस्त नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीवर आहे. यंदा पावसामुळे उत्पादनात घट झाल्याने बाजार समितीत आवक घटली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी वाढल्याने दरात तेजी आली आहे. दोन महिन्यांपासून सुरू झालेला टोमॅटोचा हंगामात बाजार भाव टिकून आहे. सुरुवातीच्या काळात टोमॅटोला सरासरी साडेचारशे ते पाचशे रुपये बाजारभाव मिळाला होता. मात्र वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा टोमॅटोच्या पिकाला फटका बसला. त्यामुळे आवक घटल्याने गेल्या वीस दिवसांपासून टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे. बाजार समितीत सध्या दोन ते अडीच लाख क्रेट टोमॅटोची दररोज आवक होत आहे.
मागील वर्षी टोमॅटोला मातीमोल बाजारभाव मिळत होता. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना भांडवल देखील वसूल करता आले नाही. यंदा मात्र समाधानकारक भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.संतोष ताकाटे, टोमॅटो उत्पादक, कारसूळ, नाशिक.
मागील वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. यावर्षी टोमॅटोची मागणी चांगली असल्याने बाजार भाव मिळतो आहे. त्यातच पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याने उत्पादनही घटले आहे. बाजार समितीत रोज वीस कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.दिलीपराव बनकर, सभापती, पिंपळगाव बाजारसमिती, नाशिक.
इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नाशिकच्या टोमॅटोला हरियाणा, बांगलादेश, उत्तर प्रदेश यासारख्या इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने बाजारभाव समाधानकारक आणि टिकून आहे. इतर राज्यातील टोमॅटोचा हंगाम हा उशिरा सुरू होणार असल्याने याचाही फायदा नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे.विनोद शिंदे, टोमॅटो व्यापारी, पिंपळगाव बसवंत, नाशिक.