मनमाड (नाशिक) : एकीकडे कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण थांबत नसताना आता टोमॅटोच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. मनमाड बाजार समितीत शुक्रवार (दि. १२) टोमॅटोच्या २० किलो क्रेटला फक्त १५० रुपये म्हणजेच प्रती किलो साडेसात रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही, या संतापातून एका शेतकऱ्याने शहराजवळील लासलगाव रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून नाराजी व्यक्त केली.
कांदा, मका यानंतर नगदी पीक म्हणून टोमॅटोला महत्त्व दिले जाते. अवघ्या काही महिन्यांत पीक हाती येते. कांद्याच्या भावातील सततच्या घसरणीमुळे अनेक शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून टोमॅटोची लागवड केली. परिणामी मनमाडसह नाशिक जिल्ह्यात टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या काढणी सुरू झाल्याने बाजार समित्यांत मोठी आवक होत असून, पिंपळगाव बाजार समितीत दिवसाला दोन लाखांहून अधिक क्रेट्सची नोंद होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोला बांगलादेश, सिलीगुडी, गुवाहाटी आदी भागांत मोठी मागणी असते. मात्र सध्या बांगलादेशातील अराजकता आणि गणेशोत्सव काळात देशांतर्गत मागणीत झालेली घट याचा फटका उत्पादकांना बसला आहे. मागणी घटल्याने भाव कोसळले असून आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या भावात सातत्याने घसरण सुरू आहे. आता टोमॅटोला देखील कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. काय पेरावे आणि काय विकावे जेणेकरून दोन पैसे हातात पडतील, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
टोमॅटोच्या लागवडीसाठी प्रती २० किलो क्रेटला १६० ते १७५ रुपये खर्च येतो. म्हणजेच प्रती किलो आठ ते नऊ रुपये खर्च पडतो. पण सध्या बाजारात प्रती किलो फक्त सहा ते सात रुपयेच मिळत असल्याने शेतकऱ्यांना दोन ते तीन रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.