नाशिक : गेल्या काही दिवसांमधील सोने-चांदी दरातील तेजी कायम असून, शनिवारी (दि. १९) सोन्याने विक्रमी ८० हजारांंचा आकडा पार केला, तर चांदीही एक लाखापासून दोन पावले मागे असून, दिवाळीपर्यंत सोने-चांदी किती विक्रमी दर नोंदविणार याची चर्चा जाणकारांमध्ये होत आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरातच सोने अडीच हजारांनी वाढल्याचे चित्र आहे.
गेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयातशुल्क सहा टक्क्यांनी कमी केल्यानंतर, पुढील काही दिवस दरांमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले होते. २४ कॅरेट सोने प्रतितोळा ८० हजारांखाली गेल्याने ग्राहकांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण होते. आणखी दर कमी होतील, असा अंदाज व्यक्त करीत असतानाच आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने-चांदीने पुन्हा उच्चांकी दराकडे झेप घेण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने युद्धजन्य स्थितीमुळे दरांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, दिवाळीपर्यंत सोने ८० हजारांचा टप्पा पार करेल हा अंदाज दिवाळीच्या 10 दिवस अगोदरच खरा ठरला आहे.
गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीच्या दरांनी उसळी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी गुरुवारी (दि. १७) २४ कॅरेट सोने ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेट सोने ७३ हजार ३०० रुपये प्रतितोळा, तर चांदी ९५ हजार रुपये प्रतिकिलो असे दर होते. मात्र, शनिवारी त्यात वाढ होऊन २४ कॅरेट सोने ८० हजार ३४०, २२ कॅरेट सोने ७३ हजार ९१०, तर चांदी ९९ हजार ९८० रुपयांवर पोहोचली. आगामी दिवाळी व लग्नसराईमुळे सोन्याला मागणी वाढतीच राहणार असल्याने तेजीही कायम राहण्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
गेल्या सहा वर्षांत सोन्याचे दर अडीच पटींनी वाढले आहेत. २०१८ मध्ये सोन्याचे दर ३१ हजार ४०० रुपये प्रतितोळा होते. ते आता ८० हजारांवर गेले आहेत. जागतिक स्तरावर युद्धस्थिती, अनिश्चितता निर्माण झाल्यास शेअर बाजार कोसळतो. सोन्याचे दर मात्र वधारतात.
सोन्याच्या दरात तेजी असली, तरी मागणी कायम आहे. विशेषत: गुंतवणूकदार मंडळी सोने खरेदीला अधिक प्राधान्य देत आहेत. दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जात असल्याने, खरेदीवर दरवाढीचा फारसा परिणाम नसल्याचे दिसून येत आहे. आगामी लग्नसराईमुळे भाव चढेच राहण्याची शक्यता आहे.गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक.