मालेगाव : टेहरे चौफुलीजवळील पाटीदार भववनाजवळ मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांच्या वाहनावर गुरुवारी (दि.19) पहाटे चारच्या सुमारास दोन वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकांने प्रसंगावधान राखत वाहन बाजूला घेतल्यामुळे भुसे थोडक्यात बचावले. याप्रकरणी चालक कृष्णा पाटील यांच्या फिर्यादीवरून छावणी ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
भुसे यांच्यासह चालक व अन्य एकजण गुरुवारी पहाटे कार (एम.एच 15 एफ.टी. 5377) मधून दाभाडीकडून मालेगावकडे येत असताना यांच्या वाहनावर पाठीमागून येणारी कार (एम.एच. 41 बीएच 0720) हिच्यातील संशयित तीन-चार तरुणांनी भुसे यांच्या वाहनाच्या बोनेटवर रॉडने वार करीत थांबविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दुसर्या कार (एम.एच. 02 सीएच 4141) मधील संशयितांनी भुसे यांच्या कारला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान भुसे यांच्या वाहनचालकांने रॉडचा वार चुकवीत वाहन भरधाव घेतल्याने टेहेरे चौफुलीजवळील मालेगाव-सटाणा रस्त्यावरल पाटीदार भवनाजवळील दुभाजकावर धडकले. त्यातच त्यांच्या वाहनाचे पुढील टायर फुटल्याने अपघात झाला. भुसे यांच्या वाहनामागे असलेली दोन्ही वाहने ही दुभाजकांवर धडकली. यात भुसे यांचे वाहन चालक पाटील यांच्यासह अन्य एकजण तसेच हल्लेखारांच्या दोन्ही वाहनातील तीन ते चार जण जखमी झाले. यावेळी मोठ्याने झालेला आवाज ऐकून परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाले. दरम्यान, भुसे यांच्या वाहनावरील जखमी चालक पाटील व अन्य एकासह संशयित मुदस्सीर निहाल खान, मुजिर मोहमद अक्रम मोहमद, मुश्रीम मोहमद (सर्व रा. मालेगाव) यांना उपचारार्थ त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी संशयितांची दोन्ही वाहने जप्त केली आहेत. वाहनांची तपासणी केली असता त्या वाहनातून गो-तस्करीसाठी लागणारे साहित्य जप्त पोलिसांनी जप्त केली आहेत.
संशयित टवाळखोर हे गो-तस्कर असल्याचा अंदाज आहे. दाभाडीकडून मालेगावकडे येत असताना आयशर वाहन भरधाव वेगात गेले. त्या वाहनाचा आम्हाला संशय आल्याने त्याचा पाठलाग केला. दरम्यान पाठीमागून आलेल्या दोन्ही वाहनातील संशयितांनी आमच्यावर हल्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आयशर जप्त करत गायींची सुटका केली आहे.- अविष्कार भुसे, मालेगाव