नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाला धार्मिक अधिष्ठान लाभून वातावरण भक्तिमय करण्यासाठी गोदाकाठी तीन दिवसीय सिंहस्थ महाध्वज प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात शुक्रवारी (दि. ३०) सकाळी ८.१५ वाजता ध्वजदंड प्रतिष्ठापना आणि नगरप्रदक्षिणेचा प्रारंभ होणार आहे. दुपारी १ वाजता भव्य धर्मध्वज शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
त्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाने केले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे शनिवारी (दि. ३१) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुपारी १२.०२ वाजता सिंहस्थ महाध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्याला राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह देशातील मंत्री, लोकप्रतिनिधी व धार्मिक क्षेत्रातील साधू-महंतांसह प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडवणारा हा सोहळा तीन दिवस चालणार आहे. यात यज्ञ विद्यावाचस्पती वेदूर्ती भालचंद्र एकनाथशास्त्री शौचे गुरुजी आणि यज्ञाचार्य पंडित वैभव दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त व वेदोक्त पद्धतीने विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत.
दरम्यान, नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या सोहळ्याला नाशिककर नागरिक, भाविक, साधू-संत-महंतांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल, अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, उपाध्यक्ष दिलीप शुक्ल, वैभव दीक्षित, सरचिटणीस प्रतीक शुक्ल आणि कार्याध्यक्ष शेखर शुक्ल यांनी केले आहे.
गोदावरी तीरावर शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी १२.३० या वेळेत प्रायश्चित्त संकल्प, तीर्थपूजन, पंचाचार्य प्रदान, प्रधान संकल्प, गणेशपूजन, पंचांग विधान, ब्राह्मण वरण, प्रधानदेवता स्थापना आणि नवग्रह रुद्र स्थापना हे विधी होतील. दुपारी २.३० ते सायंकाळी ७.३० या कालावधीत स्तनपन विधान, नवग्रह हवन, प्रतिष्ठापना हवन, धान्याधिवास, शय्याधिवास, सायंपूजन आणि श्री गोदावरी प्रार्थना होणार आहे. त्यानंतर शनिवारी (दि. ३१) मुख्य ध्वजारोहण सोहळ्याची तयारी केली जाईल.
गोदातीरी रामकुंडावर शनिवारी (दि. ३१) सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत स्थापित देवतांचे पूजन होईल. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या कालावधीत राष्ट्रपती आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संकल्प, गणेशपूजन, पंचाचार्य समर्पण आणि तीर्थपूजनाचे विधी पार पडतील. त्यानंतर दुपारी १२.०२ वाजता शुभमुहूर्तावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ महाध्वजारोहण करण्यात येईल. यावेळी गोदाआरती आणि प्रार्थनाही होणार आहे. सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत प्रतिष्ठापना हवन, सायंपूजन आणि गोदाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक येथे रामकुंडावर रविवारी (दि. १) सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत प्रात;पूजन, उत्तरांग हवन, बलिदान, पूर्णाहुती, अवभृत स्नान, गोदाआरती, प्रार्थना आणि कर्म समर्पण हे धार्मिक विधी होतील. या विधीनंतर तीन दिवसीय प्रतिष्ठापना सोहळ्याची सांगता होईल.