नाशिक: नववर्षाच्या स्वागतासाठी पयटनाचे जोरदार बेत आखले जात आहेत. गेल्या काही वर्षात पयटन क्षेत्रावर केंद्र सरकारने भर देताना अनेक योजना राबविल्याने देशाच्या जीडीपीत पर्यटनाचा वाटा तब्बल आठ टक्क्यांवर (२६० अब्ज डॉलर) पोहचला आहे. भारतीय नागरिक विदेशी पर्यटनाला अधिकाधिक भर देत आहेत. विदेशात फिरण्यासाठी ६३ टक्के भारतीय प्रवाशांकडून आशिया हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण ठरले आहे.
प्रवास क्षेत्रातील नवनवीन प्रवाहांचा आढावा घेणारा 'वँडरसेफ रिपोर्ट २०२५' हा अहवाल प्रकाशित केला. आयसीआयसीआय लोम्बार्डचा हा अहवाल प्रवास क्षेत्राशी संबंधात विविध माहितीवर प्रकाशझोत टाकतो.
जनरेशन झेड, मिलेनियल्स आणि जनरेशन एक्स प्रवाशांचा (६३ टक्के पुरुष, ३७ टक्के महिला) दृष्टिकोन या सर्वेक्षणात समाविष्ट आहे. या श्रेणीतील प्रवासी सोयीस्कर व्हिसा प्रक्रिया आणि सोप्या सुटसुटीत कनेक्टिव्हिटीमुळे आशियाई देशातील स्थळांना भेट देण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. उत्तर अमेरिका देखील पर्यटनासाठी प्रमुख ठिकाण म्हणून समोर आले आहे. तरुण प्रवासी विशेषतः जनरेशन झेड आणि मिलेनियल्स ही पिढी जनरेशन एक्सच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया आणि युरोप/यूकेसारख्या लांब अंतरावरील ठिकाणांना भेट देण्यात अधिक रस दाखवत असल्याचे दिसून आले आहे.
भारतात प्रवास विम्याबद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता आढळून आली आहे. सुमारे ८८ टक्के प्रवाशांना या योजनेबद्दल माहिती असल्याचे दिसून आले आहे. विमान सेवेतील विलंब, हवामानातील आकस्मिक बदल आणि विविध देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे प्रवास विम्याबाबत जागरुकता वाढली आहे.
डिजिटल-तंत्रज्ञान आधारित प्रवास योजना आणि विविध सुविधांचा समावेश असलेल्या विमा योजनांचा लाभ घेणे ही आता नियमित बाब होत चालली आहे.
भारतीयांकडून अधिकाधिक पर्यटन
विदेशात जाणाऱ्या ६३ टक्के भारतीय प्रवाशांनी आशियाला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामध्ये थायलंड, जपान आणि सिंगापूरला सोपी व्हिसा प्रक्रिया आणि हवाई कनेक्टिव्हिटीमुळे यादीत अग्रस्थानी होते.
उत्तर अमेरिका, विशेषतः अमेरिका, दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पसंतीचा प्रदेश ठरला असून लांब अंतराच्या प्रवासात आवड वाढत असल्याचे दिसून येते.
जेन झेड आणि मिलेनियल्स पिढीकडून ऑस्ट्रेलिया आणि युरोप/यूके सारख्या लांब अंतरावरच्या ठिकाणांना सर्वाधिक पसंती, तर जेन एक्सकडून नजीकच्या ठिकाणांना प्राधान्य.
साहसी पर्यटनामध्ये जनरेशन झेड आघाडीवर असून ६२ टक्के व्यक्ती त्यांच्या आगामी ट्रिपमध्ये साहसी खेळांमध्ये सहभागी होण्याची योजना आखत आहेत